Home देशविदेश धर्माची नशा,करी जीवनाची दुर्दशा….

धर्माची नशा,करी जीवनाची दुर्दशा….

            “नशा ” म्हणजे वाईट गोष्ट.माणसाचे जीवन बिघडवणारी गोष्ट.माणूस नशा तेंव्हाच करतो,जेंव्हा त्याला जीवनात निराशा येते,तो पराभूत होतो,जीवनात अपयश येते.नैराश्य आणि अपयशाचे विचार माणसाला अपराधी जीवनाचे वाटायला लागतात,त्याला जीवन नकोसे वाटायला लागते,तरी पण त्याला मरावे वाटत नाही,मरावे की जगावे ? या विचाराच्या कोंडीत माणूस जेव्हा सापडतो,तेव्हा त्याला करावेसे वाटत नाही,आणि अपराधी निराशमय जीवन पण जगावेसे वाटत नाही,अशा मानसिक अवस्थेवर उपाय म्हणजे नशा होय.

             खरे तर नैराश्य आणि पराभूतपण यातून निर्माण झालेली संकल्पना म्हणजे नशा,असे जरी असले तरी नशा ही माणसाची खाजगी बाबच आहे.आपल्या खाजगी जीवनासाठी वापरायची ती गोष्ट आहे.परंतु माणूस जेव्हा खाजगी बाबीचे किंवा खाजगी जीवनाचे सार्वजनिकीकरण करतो,म्हणजे नशा जेंव्हा खाजगी न राहता ती सार्वजनिक बनते,तेंव्हा ती उग्र रूप धारण करते,तांडव करते आणि त्यातून मानवी जीवन उद्ध्वस्त होते.

            धर्म म्हणजे धारणा,आचरण.विचार धारणा आणि विचाराचे आचरण म्हणजे धर्म.कोणते विचार? तर धार्मिक विचार.

         माणसाचे सामाजिक,राजकीय,धार्मिक ,आध्यात्मिक असे विचाराचे प्रकार आहेत.

               कोणतेही विचार हे सुसंस्कारी असले पाहिजेत.कुसंस्करी नकोत,तरच मानवी जीवन सुखी आणि समृद्ध होत असते. सु म्हणजे चांगले आणि कु म्हणजे वाईट.चांगले विचार म्हणजे माणसाच्या प्रगतीचे विचार,वाईट म्हणजे माणसाच्या अधिगतीचे विचार.आणि जसे विचार तशी कृती घडत असते.जसे विचार तसे आचरण होत असते.

              ‘ धर्म ‘ हा माणसाला जोपर्यंत तारक आहे,तोपर्यंत तो ठीक आहे,पण जेंव्हा धर्म माणसाला मारक ठरतो,माणसांचे जीव घ्यायला लागतो,तेंव्हा तो मारक ठरतो.

           धर्म जो पर्यंत नैतिकतेच्या पातळीवर होता,म्हणजेच धर्म म्हणजे नैतिकता आणि नैतिकता म्हणजेच धर्म,अशी जो पर्यंत धर्माची व्याख्या होती,तो पर्यंत धर्म माणसासाठी तारक होता,परंतु धर्माने नैतिकतेचे विचार आणि धोरण सोडले तेंव्हा धर्म बिघडला.धर्म विकृत झाला.धर्म जो पर्यंत खाजगी होता,तो पर्यंत ठीक होता,परंतु जेव्हा धर्माने सार्वजनिक रूप धारण केले,तेंव्हा धर्म बिघडला.

              असे का झाले? त्याचे कारण माणसाला धर्माची नशा चढली.आणि माणूस जेव्हा कशाचीही नशा करतो,तेव्हा तो बिघडतो.तंबाखू दारू गांजा चरस ही तर भौतिक नशा होय.परंतु माणसाला विचाराची पण नशा चढते.चांगल्या विचाराची नशा काही हरकत नाही,पण वाईट विचाराची नशा जेंव्हा चढते,तेंव्हा माणसाचे जीवन बरबाद होते.

            दया क्षमा शांती,सत्य न्याय नीती, प्र द न्या शील करुणा,स्वातंत्र्य बंधुता समता न्याय, तर्क प्रयोग अनुभव .या गोष्टींचे,विचाराचे,मूल्याचे पालन न करणे म्हणजे वाईट होय.आणि यांचे पालन म्हणजे चांगले होय.

     वाईट विचार आचरण केल्याने माणसाचे जीवन समृद्ध न होता उध्वस्त होते.

     धर्माने नीतिमत्ता म्हणजे चांगल्या गोष्टी सोडल्या म्हणून धर्माची नशा माणसाला चढली.नशेतूनच धर्म हा केवळ देवा पुरता , आणि माणसापुरता मर्यादित न राहता,त्याचे सार्वजनकीकरण झाले.धर्म घर सोडून रस्त्यावर आला आणि म्हणून दोन धर्मात भांडणे सुरू झाली, ती इतकी विकोपाला गेली की,त्यातून दहशतवाद निर्माण झाला.जिहाद म्हणजे धर्मयुद्ध पेटले.आणि या धर्मयुद्धाने जागतिक रूप धारण केले.एव्हढेच नव्हे तर आपलाच धर्म या पृथ्वीतलावर असावा,इतर धर्माचे नामनिशान नको,इथपर्यंत ही धर्माची नशा चढली,आणि धर्म माणसांना कापीत सुटला बेफामपणे.केवळ दोन धर्मातच लढाई जुंपली असे नाही,तर जगातील सर्वच धर्म एकमेकाशी लढाई करताना दिसताहेत.माणसे मारताना दिसताहेत.यामुळे सनातन धर्म म्हणजे मानवधर्म नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.माणूसच शिल्लक राहणार नसेल तर मानवधर्म कसा जिवंत राहील ?

     आज मीतिस जगापुढे मोठी दोन आव्हाने उभी आहेत,धार्मिक दहशतवाद आणि आर्थिक दहशतवाद.धार्मिक दहशतवाद हिंदू मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध यांचा जेहाद.आणि आर्थिक दहशतवाद म्हणजे वर्गलढाई.या दोन लढाईत मानवतावाद ,मानवी विचार,मानवतधर्म चिरडून जात आहेत.धर्माची नशा जोपर्यंत उतरणार नाही,म्हणजेच सारीच माणसे जो पर्यंत धर्म ही आपली खाजगीबाब आहे,सार्वजनिक नाही.हे मान्य करणार नाहीत,आणि राजकारणी जात आणि धर्माचा सत्तेसाठी निवडून येण्यासाठी वापर करणार आहेत,तो पर्यंत धर्माची नशा उतरणार नाही,आणि माणसे मेल्याशिवाय राहणार नाहीत.

              लेखक

              दत्ता तुमवाड

          सत्यशोधक समाज नांदेड

दिनांक : 30 जानेवारी 2026,फोन : 9420912209