प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
मतदारांचे अस्तित्व व स्वाभिमान हा त्यांचा योग्य वर्तणुकीचा भाग आहे.मतदारांची मानसिकता गुलाम आणि लाचार असेल तर ते रुपये घेऊन मताला विकतील आणि मतदारात स्वाभिमान असेल तर ते चंद रुपयात स्वत:च्या मताला विकणार नाहीत..
अर्थात स्वाभिमानी व जागरूक मतदार हे जात,धर्म,पंथ,न पाहता व उमेदवारांचा द्वेष न करता योग्य उमेदवाराला मते देतात ते स्वतःच्या रक्षणासाठी!.
योग्य उमेदवार हरला तरी त्या मतदारांचे मत वाया जात नाही,तर त्या उमेदवारात व त्या मतदारांत परत नवीन उर्जा व चेतना निर्माण होतय,पुढच्या येणाऱ्या निवडणुकीला पुढे जाण्यासाठी व स्वतःचे सामर्थ्य अबाधित ठेवण्यासाठी!…
पडणाऱ्या उमेदवारांना किंवा शर्यतीत असलेल्या उमेदवारांना मत दिले तर मत वाया जाते म्हणणारे नेते,पदाधिकारी,हे मतदारांची दिशाभूल करतात व त्यांच्यात भिती निर्माण करतात हे एक वास्तव आहे.
जे पक्ष भांडवलदारांना महत्व देऊन त्यांच्या हिताचे निर्णय घेतात आणि देशातील नागरिकांच्या मुलभूत अधिकारांना गुंडाळून ठेवतात ते राजकीय पक्ष हे लोक विरोधी असतात हे मतदारांनी लक्षात घेतले पाहिजे...
जो पक्ष सत्तेवर आल्यानंतर नागरिकांच्या मुलभूत आणि बाह्य अधिकारांना नाकारुन भांडवलदारांच्या हितासाठी सर्वोतोपरी निर्णय घेतात,अशा राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांना मतदारांनी सार्वत्रिक निवडणुका अंतर्गत नाकारले पाहिजे.
जेव्हा जेव्हा मतदारांच्या किंवा देशातील नागरिकांच्या अधिकारांना केंद्र सरकार,राज्य सरकार नाकारते व त्यांच्या विरोधात निर्णय घेते,”अशा सर्व पक्षांना पराभूत केले पाहिजे व स्वतःचे संरक्षण मतदारांनी केले पाहिजे,यासाठीच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार सर्व प्रोढ नागरिकांना दिलाय..
मात्र,भारत देशातील भांडवलदार राजकीय पक्षांनी मताचा अधिकार चंद रुपयात गुंडाळून ठेवला हे या देशातील नागरिकांचे व मतदारांचे दुर्दैव आहे.तद्वतच मताचा उपयोग कशासाठी केला जातो याची जाणीव बऱ्याच भारतीय मतदारांना नाही.
यामुळे भांडवलदार राजकीय पक्ष हे सर्व प्रकारच्या सार्वत्रिक निवडणूका दरम्यान मतदारांना पर मत १ हजार रुपये देऊन त्यांचे मत खरेदी करतात असे चित्र आहे.हा प्रकारच भारत देशात भ्रष्टाचार करणारे मार्ग खुले करतोय.
म्हणूनच भारत देशात सत्तेच्या बळावर भ्रष्टाचारी व्यवस्था निर्माण झाली असून नागरिकांचे अधिकार नाकारु लागली आहे.हे भारतीय नागरिकांच्या गुलामीची चाहुल आहे.
एकंदरीत भांडवलदारांच्या हिताचे सत्ताधाऱ्यांकडून घेतले जाणारे निर्णय व या निर्णयाला अनुसरून नागरिकांचे नाकारण्यात येणारे अधिकार बघता,देशातील नागरिकांचे सर्व प्रकारचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे हे वास्तव आहे.
तरीही महाराष्ट्र राज्यासह भारतातील मतदार हे रुपये घेऊन भांडवलशाही,भ्रष्टाचारी,लोकविरोधी,पक्षाच्या उमेदवारांना निवडून देतात आणि स्वतः अप्रामाणिक कृत्य करतात,लोकशाही विरोधी कृतीचे समर्थन करतात,हे भारतीय मतदारांचे लोकशाहीप्रती व स्वतःच्या अधिकाराप्रती अशिक्षित पणाचे लक्षण असल्याचे लक्षात येते आहे.
सार्वत्रिक निवडणूका अंतर्गत स्वतःच्या मुलभूत अधिकारांना व बाह्य अधिकाराला लक्षात न घेता मताधिकार बजावणारे मतदार हे भारतात आहेत हे खेदाने म्हणावे लागते.


