दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगांतील आशय जीवनात उतरविला, तर मानवी आयुष्य अधिक सुसंस्कृत आणि समृद्ध होऊ शकते, असे मत व्याख्याते गणेश शिंदे यांनी व्यक्त केले. हभप गोरक्षनाथ महाराज उदागे यांच्या माध्यमातून ज्ञानदा संस्कृत प्रबोधनी तथा ज्ञानदा प्रकाशन यांच्या वतीने आयोजित ज्ञानभक्ती महोत्सवातील ‘मोगरा फुलला’ या कार्यक्रमात ते बोलत होते. संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात गायिका सन्मिता धापटे शिंदे यांच्या ‘रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा’ या अभंगाने झाली. माऊलींच्या जीवनचरित्रातील अभंग व ओव्यांच्या आधारे गणेश शिंदे यांनी चिंतनपर आणि आशयगर्भ निरूपण केले.
ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगांचा दाखला देत शिंदे यांनी मानसिक स्वास्थ्य आणि आत्मसंयमावर भर दिला. शब्द हे प्रभावी माध्यम असून त्यांचा संयमित वापर आवश्यक आहे. मनावर नियंत्रण मिळवणे हेच खरे संतत्व असल्याचे सांगत, केवळ संसारातून मुक्त होणे म्हणजे संतत्व नव्हे, तर अंतर्मन स्थिर ठेवणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इतरांची निंदा न करता विठ्ठलाच्या नामस्मरणात वेळ घालवावा, असा संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमात ‘बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल’, ‘अबीर गुलाल अवघा रंग’, ‘लगीन देवाचं लागत’, ‘माऊली माऊली’, ‘अवघा रंग एक झाला’ या अभंगांच्या सादरीकरणातून ज्ञानेश्वर महाराजांचा जीवनपट उलगडत गेला. त्यांच्या आयुष्यातील दुःख, विठ्ठलाशी झालेली भेट आणि संजीवन समाधीपर्यंतचा प्रवास शिंदे यांनी प्रभावी शब्दांत मांडला. या सादरीकरणाने उपस्थित श्रोते भावविभोर झाले. ज्ञानभक्ती महोत्सवात अभंग, निरूपण आणि चिंतन यांचा सुरेख संगम अनुभवण्यास मिळाला.



