Home देशविदेश संविधान हे सर्वांचेच आणि सर्वांसाठी…

संविधान हे सर्वांचेच आणि सर्वांसाठी…

        भारताचे संविधान हे बाबासाहेबाने तयार केले,तेच त्याचे शिल्पकार आहेत,आणि यात sc,st,obc,अल्पसंख्यांकांना आरक्षण दिले,त्यांच्याच हिताचे कायदे केले,हे जरी खरे असले तरी पूर्णसत्य नाही,तर अर्धसत्य आहे.कारण बाबासाहेबांनी फक्त संविधानाचा कच्चा आराखडा बनविला आणि तो निवडून आलेल्या सार्वभारतीयांच्या प्रतिनिधींच्या संविधान सभेत चर्चेसाठी ठेवला,या आराखड्यावर देशातील कानाकोपऱ्यातून आलेल्या लोकप्रतिनिधींनी आपले मत मांडले,त्यांना जे मान्य नाही,आणि जे मान्य आहे तेही सांगितले,असे एकवेळा नाही तर अनेकवेळा संविधान सभेत संविधानाच्या आराखड्यावर चर्चा होऊन सर्वांचे एकमत झाल्यावरच मग हे संविधान स्वीकारण्यात आले.अर्थात सर्वं भारतातून अनेक जिल्ह्यातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीत सर्वच जातीचे,साऱ्याच धर्माचे,आणि वर्गाचे लोक होते.संस्थानिक पण होते,अनेक नामवंत वकील,बॅरिस्टर ,विचारवंत होते.एक दोन दहा पन्नास नव्हे,तर बहुमताने संविधान मान्य करण्यात आले,बाबासाहेबांनी तरतूद केलेल्या सर्वच कलमांचा स्वीकार केला गेला असे नाही.संविधान सभेतील अनेकांनी सुचविलेल्या तरतुदींचा पण विचार झाला आहे.खरे तर बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारताच्या आराखड्यानुसार हे संविधान परिपूर्ण आहे,असे नाही,कारण संविधान सभेतील त्यांचे संविधानसंबंधीचे शेवटच्या भाषणात त्यांनी एक शंका उपस्थित केली आहे,ती ही की,ते म्हणाले ” संविधान कितीही चांगले असले तरी राबविणारे संविधान विरोधी असतील तर हे संविधान शेवटी कुचकामीच असेल”. 

      बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली आणि तिला पर्याय दिला भारतीय राज्यघटनेचा.हे दोन ग्रंथ अगदी एकमेकांचे विरुद्ध नव्हे शत्रूच आहेत.

    मनुस्मृतीचे sc,st,obc, याचे मानवीय हक्क आणि अधिकार नाकारले होते,मतदानाचा अधिकार लोकशाही नाकारली होती ती संविधानाने देऊन हुकुमशाही,गुलामगिरी नष्ट केली,आर्थिक सामाजिक राजकीय न्याय मनुस्मृतीचे फक्त ब्राम्हण क्षत्रिय वैश्य या 15 टक्क्यांना च दिला होता,तो सर्वासाठी खुला केला.विचार अभिव्यक्ती संघटना स्वातंत्र्य फक्त 15 टक्क्यांनाच होते,तेही सर्वांसाठी खुले केले.शिक्षण ,संपती,उद्योग,नोकरी यांचे आरक्षण,देव आणि धर्माचे आरक्षण फक्त 15 टक्क्यांनाच होते,ते काढून घेऊन 85 टक्के लोकांसाठी म्हणजे sc,st,obc, साठी लागू केले.याचा अर्थ सर्वांनाच समान संधी आणि समान दर्जा दिला,सामाजिक भेदभाव,शिवाशिव,उच्चनीचता नाहीशी करणारा कायदा केला.

       आर्थिक समाजवाद,धार्मिक धर्मनिरपेक्षता,सामाजिक समता,राजकीय समानता ही मनुस्मृती ने नाकारली होती ती सर्वांना दिली,जातीची उतरंड मोडणारा कायदा केला.

    एकंदरीत सर्वांसाठीच म्हणजे जातीचा,धर्माचा,वर्गाचा भेदभाव न करता सर्वांसाठीच एकच कायदा,आणि कायद्यापुढे सारेच समान अशाप्रकारची न्याय स्वातंत्र्य बंधुभावाची राज्यघटना बाबासाहेबांनी साऱ्याच भारतीयांना दिली.

    खरे तर अस्पृश्यता,जातीची उच्चनीचता,धर्माचा बहिष्कार यामुळे सारे आयुष्य बाबासाहेबांनी त्रासात काढले,तरी ज्या जातींनी धर्माने त्यांना छळले त्यांना सुद्धा समान लेखले.सर्वांसाठी एकच कायदा केला.हे त्यांचे मोठेपण म्हणूनच त्यांना महामानव म्हणतात.कारण महामानवांचा जन्म ज्या जातीत किंवा धर्मात झाला,केवळ त्यासाठीच ते कार्य न करता सब भूमी गोपालकी,अखिल मानवजात एकच,सर्वांचा धर्म एकच तो म्हणजे माणुसकी ही जात आणि मानवता हा धर्म,या न्यायाने हे महामानव कार्य केले,म्हणूनच ते एका जातीचे एका धर्माचे न राहता अखिल मानवजातीचे बनले.ज्यांच्या बुद्धीची सखोलता आणि मनाची विशालता तेच महामानव होतात.संकुचित विचारांचे बाबासाहेब नव्हते,म्हणून खंडप्राय भारताची विविध संस्कृतीचा अभ्यास करूनच सर्वांनाच न्याय मिळेल,त्यांचे हक्क मिळतील,ते गुलामीत राहणार नाहीत अशाप्रकारचे संविधान त्यांनी भारतातला दिले.अहोरात्र कष्ट करून झोपमोड करून,संविधान लिहिण्यात आपली शक्ती खर्च केली,मसुदासमितीचे जे काही सदस्य होते,त्यांनी त्यांच्या अडचणीमुळे वेळ देऊ शकले नाहीत,म्हणूनच सारा भार बाबासाहेबावरच पडला.यात ते आजारी पडले,त्यांचा देहांत पण झाला.शेवटी त्यांचेच वाक्य ” आधी मी भारताचा आणि शेवटीपण भारताचाच आहे ” या त्यांच्या विचाराने ते खरे राष्ट्राभिमानी राष्ट्रनिष्ठ सिद्ध झाले.

मनुस्मृती जिच्यात समान न्याय नाही,सामाजिक समता नाही,लोकशाही नाही,जी गुलामीची व्यवस्था राबवू इच्छिते,असे विषमतावादी व्यवस्थेचे संविधान जाळून तिला पर्याय म्हणून समतावादी व्यवस्थेचे संविधान दिले,ते बाबासाहेब आणि ते संविधान हे कुण्या एका जातीचे,धर्माचे नसून सर्वांचेच,सर्वच भारतीयांचे आहेत.याचा विसर पडता कामा नये.

       लेखक : दत्ता तुमवाड

         सत्यशोधक समाज नांदेड.

दिनांक : 8 डिसेंबर 2025.फोन : 9420912209.