Home Maharashtra अधिकारी खोटे बोलतात आणि कामचुकारपणा करतात तेव्हा सरपंच,उपसरपंच आणि सामान्य नागरिकांनी काय...

अधिकारी खोटे बोलतात आणि कामचुकारपणा करतात तेव्हा सरपंच,उपसरपंच आणि सामान्य नागरिकांनी काय करायचे? — उपठेकेदार म्हणजे काय?,भाजपाच्या काळात भ्रष्ट यंत्रणेला संरक्षण मिळतय?… — मौजा शंकरपूर व मौजा महादवाडी येथील अयोग्य कामातंर्गत जल जिवन मिशनचे प्रकरण साक्षीदार! — भाग – ०१… 

हिवाळी अधिवेशन 

     प्रदीप रामटेके 

      मुख्य संपादक  

       थोडक्यात,खोटे बोलणे म्हणजे केवळ चुकीचे बोलणे नव्हे,तर हेतुपुरस्सर असत्य माहिती देऊन इतरांना फसवण्याचा प्रयत्न करणे होय.

          मौजा शंकरपूर व मौजा महादवाडी येथील जल जिवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठाची विविध कामे अयोग्य पद्धतीने करुन तिथल्या नागरिकांना स्वच्छ व योग्य पाण्यापासून वंचित करण्याचे ताजे उदाहरण समोर आहे.

मौजा माहादवाडी,ता.चिमूर….

             जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा कार्यालय चिमूरच्या उपविभागीय अभियंता पोटुडे व कनिष्ठ अभियंता मेश्राम यांनी तर मौजा महादवाडी येथील सरपंच भोजराज कामडी यांना आरो प्लाॅन्ट संबधाने बेकायदेशीर लेखी पत्र देवून त्यांची व गावातील नागरिकांची चक्क फसवणूक केली आहे.

         मौजा महादवाडी येथे जल जिवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालय चिमूरच्या वतीने पाणीपुरवठाची सुधारीत कामे सुरु करण्यात आली.

         पण,सदर कामे करताना योग्य नियोजनातंर्गत कामे केली गेली नाही.यामुळे ज्या विहिरीतून मौजा महादवाडी येथील नागरिकांना स्वच्छ पाणी मिळत होते,ते विहीर नवीन खोदकामामुळे खचल्या गेली आणि वाॅल खोलात गेला.वाॅल कुठे गेला याची माहिती सध्यातरी कुणालाच नाही.

          मौजा महादवाडी येथील नागरिकांना स्वच्छ पाणी देणारी विहीर परत खोदकामामुळे खचल्या गेली आणि तेथील नागरिकांना भर पावसाळ्यात गढुळ पाण्याचा सामना करावा लागला.

          चुकीच्या कार्यपद्धती नुसार मौजा महादवाडी येथील नागरिकांना स्वच्छ पाण्यापासून वंचित करण्याचे काम उपविभागीय अभियंता पोटुडे, कनिष्ठ अभियंता मेश्राम,उपठेकेदार पवन बंडे यांच्याकडून झाले.

           यामुळे सरपंच भोजराज कामडी यांनी मौजा महादवाडी वासियांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना लेखी निवेदने दिली व चर्चा केली.

         पण,जि.प.ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालय चिमूरचे उपविभागीय अभियंता पोटुडे आणि कनिष्ठ अभियंता मेश्राम,उपठेकेदार पवन बंडे यांनी मौजा महादवाडी येथील नागरिकांना स्वच्छ पाणी देण्यास कुठल्याही प्रकारची तसदी घेतली नाही.

          म्हणूनच सरपंच भोजराज कामडी यांनी मौजा महादवाडी येथील नागरिकांना अस्वच्छ पाण्यामुळे विविध आजार होऊ नये म्हणून लेखी पत्राद्वारे आत्मदहन करण्याचा लेखी इशारा उपविभागीय अभियंता पोटुडे यांना दिला होता.

            सरपंच भोजराज कामडी हे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालय चिमूर पुढे आत्मदहन करणार हे लक्षात येताच उपविभागीय अभियंता पोटुडे व कनिष्ठ अभियंता मेश्राम यांनी मौजा महादवाडी येथील नागरिकांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आरो प्लाॅन्ट बसवून देतो असे दिनांक ०१/०९/२०२५ ला लेखी पत्र दिले व वेळ मारुन नेण्याचा बेकायदेशीर प्रकार केलाय.हा सदर उपविभागीय अभियंत्याचा विश्वासघातकी प्रकारच मौजा माहादवाडी येथील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम पाडणारा ठरला व सरपंच भोजराज कामडी यांच्या योग्य कर्तव्याचे वाभाळे काढणारा ठरला..

           उपविभागीय अभियंता पोटुडे,कनिष्ठ अभियंता मेश्राम यांनी उपठेकेदार पवन बंडे हे आरो प्लाॅन्ट बसवून देणार असे पत्रात म्हटले आहे.

             प्रश्न हा पडतो की उपठेकेदार म्हणजे काय?,मग ठेकेदार कोण? खरा ठेकेदार बिळात लपून बसला आहे काय? खऱ्या ठेकेदाराने परसेंटेजवर मौजा महादवाडी येथील नळयोजनेचे काम उपठेकेदार पवन बंडे यांना दिले आहे काय? मौजा महादवाडी येथील नळयोजनेच्या कामाचा कंपनीच्या नावाने कंत्राट करारनामा झाला आहे की वैयक्तिक व्यक्तीच्या नावाने कंत्राट करारनामा झाला आहे?उपठेकेदार पवन बंडे यांना नळयोजनेच्या कामचा अनुभव आहे काय? नळयोजनेच्या कामाचे अंदाजपत्रकासह प्रशासकीय मंजुरी पत्र मौजा महादवाडी ग्रामपंचायतला का म्हणून दिले नाही?

          तद्वतच मौजा महादवाडी येथे आरो प्लाॅन्ट बसविण्याच्या कामाची प्रशासकीय व शासकीय मंजुरी उपविभागीय अभियंता पोटुडे यांनी घेतली होती काय? मौजा महादवाडी येथील नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी आरो प्लाॅन्टच्या बांधकामाबाबत अंदाजपत्रक आराखड्यानुसार प्रशासकीय व शासकीय मंजुरी घेतली नसेल तर आरो प्लाॅन्ट बसवण्यासाठी येणारा लाखो रुपयांचा खर्च हा कुणाच्या बोकांडीत उपविभागीय अभियंता पोटुडे मारणार होते आणि कोणत्या उद्देशाने मारणार होते?हा प्रश्न सुध्दा गंभीर आहे.

         मौजा महादवाडीचे सरपंच भोजराज कामडी यांची प्रतिष्ठा व इज्जत पणाला लावणाऱ्या उपविभागीय अभियंता पोटुडे यांना आरो प्लाॅन्ट बसवण्यासाठी १७ डिसेंबरची आखरी मुदत आहे.

         उपविभागीय अभियंता पोटुडे यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे सरपंच भोजराज कामडी यांना मौजा महादवाडी येथे आरो प्लाॅन्ट बसवण्यासाठी आत्मदहन करण्याचे लेखी पत्र परत त्यांना द्यावे लागले,यासारखे उपविभागीय अभियंता पोटुडे यांचे चुकीचे व विश्वासघाताचे काम दुसरे नसावे.

****

मौजा शंकरपूर,ता.चिमूर…

        शंकरपूरला सुध्दा जल जिवन मिशन अंतर्गत ७ करोड रुपयांच्या नळयोजनेची कामे सुरु आहेत.पण ही कामे निकृष्ट दर्जाची केली आहेत.सदर कामात तांत्रिक व आर्थिक अनियमितता आढळून आल्याने उपसरपंच अशोक चौधरी यांनी मौजा शंकरपूर वाशियांच्या हितासाठी महाराष्ट्र जल जीवन प्राधिकरण विभाग चंद्रपूर कार्यालयात अनेकदा पत्रव्यवहार केला.

          पाणी पुरवठा नळ योजनांची कामे योग्य दर्जाची करावी,निकृष्ट दर्जाच्या कामाची योग्य चौकशी करावी,आर्थिक गैरव्यवहार टाळावे,अशी आग्रही मागणी प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता व अधिक्षक अभियंता यांच्याकडे उपसरपंच अशोक चौधरी यांनी केली.

           परंतु संबंधित जबाबदार अभियंत्यांनी उपसरपंच अशोक चौधरी यांच्या रास्त मागणीकडे दुर्लक्ष केल्याने,”पाण्याच्या टाकीवर चढून त्यांना मौजा शंकरपूर वाशियांच्या हितासाठी आंदोलन करावे लागले होते.

           कामाबाबत वरिष्ठांना खोटे अहवाल देणारे,काम विलंबित करणारे,कामात अनियमितता करणारे,अभियंता,पर्यवेक्षक,ठेकेदार यांच्यावर चौकशीअंती कारवाई करण्यात यावी अशी मागणी उपसरपंच अशोक चौधरी यांनी वरिष्ठांना केली.

        उपसरपंच अशोक चौधरी यांची कायदेशीर व रास्त मागणी कडे महाराष्ट्र जल जिवन प्राधिकरण चंद्रपूर येथील कार्यकारी अभियंता व अधिक्षक अभियंता यांनीही जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले.

*****

निकृष्ट दर्जाचे कामे व अयोग्य कार्यपद्धत…

           मौजा शंकरपुरचे उपसरपंच अशोक चौधरी व मौजा महादवाडीचे सरपंच भोजराज कामडी यांनी मुंबई येथील ग्रामीण पाणीपुरवठा मंत्रालय गाठत मंत्री ना.गुलाबराव पाटील व प्रधान सचिवांना निवेदन दिले व उचित चौकशीची आणि कारवाईची मागणी निवेदनाद्वारे केली.

           परंतु महाराष्ट्र जल जिवन प्राधिकरण चंद्रपूर कार्यालयाचे कार्यकारी अभियंता,अधिक्षक अभियंता हे मौजा शंकरपूर येथील नळ योजनेच्या निकृष्ट कामांची योग्य चौकशी करीत नसतील व उर्वरित कामे वेळेत करणार नसतील तर लोकप्रतिनिधी असलेल्या उपसरपंच अशोक चौधरी यांनी आत्महत्या करावी,अशी अपेक्षा संबंधित अभियंत्यांची आहे काय?

         याचबरोबर चंद्रपूर जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता,जि.प.ग्रामीण पाणिपुरवठा कार्यालय चिमूरचे उपविभागीय अभियंता हे मौजा महादवाडी नळ योजनेच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची व भ्रष्ट कार्यपद्धतीची चौकशी करीत नसतील आणि त्यांनी लेखी दिल्यानुसार मौजा महादवाडी येथे आरो प्लाॅन्ट बसवण्यासाठी टाळाटाळ करीत असतील तर मौजा महादवाडी येथील सरपंच भोजराज कामडी यांना आत्मदहन करण्यास उपविभागीय अभियंता पोटुडे हे प्रवृत्त करीत आहेत,असे म्हणावे काय?

            मात्र भाजपाच्या सत्ता काळात अनुभव नसलेल्या कंत्राटदारांना चिमूर तालुक्यात नळ योजना अंतर्गत विविध कामे दिली जात असल्याने नळ योजनेच्या कामात उत्कृष्ट दर्जा दिसून येत नाही या सत्याला कोण स्विकारेल?

          परत जल जिवन मिशन कामाला अनुसरून अधिकारी खोटे बोलतात असे अनेकदा समोर आलेले आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे.याचबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निकृष्ट दर्जाच्या कामांची तक्रार केली तरी ते सुद्धा स्वतःच्या टेबलवरुन हलत नसल्याचे पुढे आले आहे.यामुळे तक्रारीला व योग्य कामाला महत्व उरले नसल्याचे त्यांनीच स्पष्ट केले आहे.

       स्वतःचे काम टाळण्यासाठी किंवा चुकीची जबाबदारी झटकण्यासाठी अधिकारी खोटे बोलू शकतात हे नाकारता येत नाही.

       काही वेळा वैयक्तिक फायद्यासाठी खोटी माहिती अधिकाऱ्यांकडून दिली जाते,या खोट्या माहितीत कदाचित भ्रष्ट कारभार दडलेला राहात असेल असी शंका नागरिकांना आहे.

            वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या किंवा राजकीय दबावामुळे सत्य लपवण्यासाठी किंवा चुकीची माहिती देण्यासाठी ते भाग पडू शकतात हे सुद्धा नाकारता येत नाही.

          दिशाभूल करण्यासाठी किंवा चुकीचा विश्वास निर्माण करण्यासाठी हेतुपुरस्सर असत्य माहिती देणे होय,ही एक सामान्य मानवी कृती असून त्याचे अनेक प्रकार आणि कारणे आहेत.आणि ती ओळखण्यासाठी देहबोलीतील बदल आणि प्रश्नांचा वापर केला जाऊ शकतो,तसेच सक्तीचे खोटे बोलणे हे एक मानसशास्त्रीय आव्हान असू शकते.

          चुकीचा विश्वास देण्यासाठी केलेली कोणतीही कृती म्हणजे खोटे बोलणे होय किंवा स्वतःला असुरक्षिततेपासून वाचवणे हा त्यामागील उद्देश असतो.असेच काम जि‌.प.ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालय चिमूरचे उपविभागीय अभियंता पोटुडे यांनी सरपंच भोजराज कामडी यांच्या बरोबर केले काय?असा प्रश्न मौजा महादवाडी नागरिकांच्या द्वारे उपस्थित केला जात आहे.

         तरीपण सामाजिक परिस्थितीत जुळवून घेण्यासाठी किंवा अडचणी टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी खोटे बोलणे बरोबर आहे काय?