Home Maharashtra ऊसतोड मजुरांमुळे पिंपरी बुद्रुक येथे आठवडे बाजाराला गर्दीचे स्वरूप,पालेभाज्यांच्या किमतीत विक्रमी वाढ…

ऊसतोड मजुरांमुळे पिंपरी बुद्रुक येथे आठवडे बाजाराला गर्दीचे स्वरूप,पालेभाज्यांच्या किमतीत विक्रमी वाढ…

  बाळासाहेब सुतार

नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी 

        पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील आठवडे बाजार ऊसतोड मजूर कामगारामुळे चांगलाच प्रतिसाद मिळाला चालू वर्षाच्या ऊसतोड हंगामामुळे गावात आलेल्या ऊसतोड मजुरांच्या मोठ्या स्थलांतराचा पिंपरी बुद्रुक येथील बाजारपेठेवर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. मागील दोन–तीन आठवड्यांत गावातील किराणा दुकानं, भाजी मंडई, हॉटेल व्यवसाय, चहाचे स्टॉल, तसेच दैनंदिन गरजांच्या वस्तूंच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे.

         गावात येणाऱ्या मजुरांची संख्या मोठी असल्याने बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ वाढली असून विक्रेत्यांच्या दृष्टीने हा काळ अत्यंत फायद्याचा ठरत आहे. किरकोळ विक्रेत्यांच्या मते, दैनंदिन उलाढाल नेहमीपेक्षा दुप्पट होत असून विशेषतः खाद्यपदार्थ, कपडे, बूट-चप्पल, तसेच मोबाइल दुरुस्ती व खरेदीत वाढ झाली आहे.

        स्थानिक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, ऊसतोड मजुरांचे गावात येणाऱ्या हंगामी वास्तव्यासह त्यांच्या रोजच्या खर्चामुळे आर्थिक व्यवहारात चालना मिळते. अनेक दुकानांमध्ये रोख व्यवहार वाढले असून काही दुकानांमध्ये उधारीचीही गती वाढली आहे. ग्रामीण भागातील लहान व्यवसायिकांसाठी हा हंगाम आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा होत असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

         शेतकरी आणि साखर कारखान्यांच्या गतीमान कामकाजा सोबतच गावातील बाजारपेठेची वाढलेली उलाढाल ही पिंपरी बुद्रुकसाठी सकारात्मक चिन्ह मानली जात आहे. गावात आर्थिक चक्र फिरत राहिल्याने स्थानिक रोजगारालाही हातभार लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.