Home Political आळंदी नगरपरिषद निवडणूक : प्रभाग ५ मध्ये खुशी सागर बोरुंदिया यांची विकासाची...

आळंदी नगरपरिषद निवडणूक : प्रभाग ५ मध्ये खुशी सागर बोरुंदिया यांची विकासाची नवी दिशा…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : आळंदी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात नव्या पिढीचे नेतृत्व पुढे येत आहे, प्रभाग क्रमांक ५ मधून उच्च शिक्षित व सामाजिक कार्यात सातत्याने कार्यरत असलेल्या खुशी सागर बोरुंदिया यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे. सामाजिक कार्यकर्ते व माजी उपनगराध्यक्ष सागर बोरुंदिया यांच्या कार्याचा वसा पुढे नेत, नागरिकाभिमुख आणि पारदर्शक प्रशासनाची नवी दृष्टी त्यांनी मांडली आहे.

     आळंदी ही संत परंपरेने समृद्ध अशी आध्यात्मिक नगरी. या नगरीच्या विकासाकडे पाहताना केवळ रस्ते आणि पाणीपुरवठा नव्हे, तर संस्कृती, पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकी या घटकांचाही विचार आवश्यक आहे. खुशी बोरुंदिया यांचा दृष्टिकोन या सर्व अंगांचा समतोल राखणारा आहे. “वडिलांनी जसे जनतेसाठी कार्य केले तसेच मीही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत प्रभाग क्र. ५ ला विकासाचा आदर्श रोड मॉडेल बनवेन,” अशी त्यांची भूमिका केवळ घोषणेसारखी वाटत नाही, तर त्यांच्या पूर्वीच्या सामाजिक कार्यावरून ती विश्वासार्ह वाटते.

     प्रभाग क्रमांक ५ मध्ये मूलभूत समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. खुशी बोरुंदिया यांनी या सर्व प्रश्नांकडे केवळ प्रशासनिक नव्हे तर नागरिकांच्या सहकार्याने सामूहिक दृष्टीकोनातून पाहण्याची भूमिका घेतली आहे. त्यांचा विकास आराखडा – कार्यक्षम जलनिस्सारण, सर्वसमावेशक स्वच्छता योजना, महिला व युवकांसाठी स्वयंरोजगार केंद्र, हरित उद्यान, सुसज्ज आरोग्य केंद्र, आणि वारकऱ्यांसाठी मूलभूत सुविधा हा प्रभागाच्या वास्तव गरजांशी जोडलेला आहे.

      विशेष म्हणजे त्यांनी “आळंदीचा विकास म्हणजे परंपरेचा सन्मान राखत आधुनिकतेचा स्वीकार” असे स्पष्ट केले आहे. आजच्या राजकारणात या संतुलित विचारांची नितांत गरज आहे. निवडणुकीत घोषणांची रेलचेल असते, पण विकासासाठी सातत्यपूर्ण नियोजन आणि प्रामाणिक अंमलबजावणी आवश्यक असते. त्या दृष्टीने खुशी बोरुंदिया यांचे शैक्षणिक पार्श्वभूमी, सामाजिक भान आणि संवादक्षम नेतृत्व हे प्रभागासाठी नवे पर्व ठरू शकते.

      तरुण पिढीने केवळ मतदार म्हणून नव्हे तर जबाबदार नेतृत्व म्हणून राजकारणात सहभागी व्हावे, ही वेळोवेळी व्यक्त होणारी अपेक्षा आहे. खुशी सागर बोरुंदिया यांची उमेदवारी ही त्या अपेक्षेला सकारात्मक प्रतिसाद देणारी ठरते. त्यांच्या माध्यमातून नागरिकाभिमुख, पारदर्शक व समावेशक प्रशासनाची नवी दिशा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

      आळंदीच्या विकासाचा नवा अध्याय लिहिण्याची संधी आता नागरिकांच्या हातात आहे – आणि त्या अध्यायाच्या प्रस्तावनेत “तरुण नेतृत्वाचा उदय” या शीर्षकाखाली खुशी सागर बोरुंदिया यांचे नाव उमटू शकते, अशी आशा व्यक्त करावीशी वाटते.