Home Maharashtra जल जिवन मिशन अंतर्गत चिमूर तालुक्यातील मौजा शंकरपूर येथे कामे न करणाऱ्या...

जल जिवन मिशन अंतर्गत चिमूर तालुक्यातील मौजा शंकरपूर येथे कामे न करणाऱ्या कंत्राटदाराची व अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यासंबंधाने चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन… — संपुर्ण कामांची चौकशी करा व कंत्राटदारला काळ्या यादीत टाका.:- उपसरपंच अशोक चौधरी.. — मुख्यमंत्री,पालकमंत्री,पाणिपुरवठा मंत्री यांना निवेदन सादर…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

       मौजा शंकरपूर येथील जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेतील गंभीर अनियमितता,अधिकारी व कंत्राटदारांच्या आंतरिक संगनमतामुळे ठप्प पडलेले काम,तसेच शासन निधीच्या अपव्ययाबाबत तात्काळ चौकशी व कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे चिमूर तालुक्यातील मौजा शंकरपूर ग्रामपंचायतचे उपसरपंच अशोक ज्ञानेश्वर चौधरी यांनी चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याकडे केली आहे.

         निवेदनात म्हटले आहे की जल जीवन मिशन अंतर्गत कामे न कारण्याचा प्रकार म्हणजे शंकरपूर येथील नागरिकांना स्वच्छ पाण्यापासून वंचित करणे होय.स्वच्छ पाणी हा नागरिकांचा मुलभूत अधिकार असून या अधिकाराकडे संबंधित कंत्राटदार व संबंधित विभागाने जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.

          कामाकडे दुर्लक्ष करणे हा प्रकार धोकेबाजीचा असून या प्रकरणाला अनुसरून गंभीर इशारातंर्गत प्रशासनाला जागे करण्याचा उपसरपंच अशोक चौधरी यांचा प्रयत्न आहे.

         मौजा शंकरपूर (ता. चिमूर, जि. चंद्रपूर) येथे जल जीवन मिशन अंतर्गत ७ कोटी खर्चाची पाणीपुरवठा योजना सुरू होऊन तब्बल अडीच वर्षे उलटून गेली,तरीही आजपर्यंत गावातील एकाही घरात पाण्याचा एक थेंब पोहोचलेला नाही.यामुळे मौजा शंकरपूर येथील नागरिकांचा संयम संपला आहे.

         सदर कार्यालयाद्वारे व कंत्राटदाराद्वारे शासनाला हेतुपुरस्सर बदनाम करण्याचा प्रकार दिसतो आहे.योजनेच्या अंमलबजावणीत अनेक गंभीर गैरप्रकार,भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जाचे काम उघडपणे दिसून येत आहेत.रस्त्यांचे खोदकाम अर्धवट ठेवले गेले आहे,त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे.

         पाइपलाईन आवश्यक खोलीपर्यंत न टाकता केवळ कागदावर काम पूर्ण दाखवले आहे.स्विच रूमचे बांधकाम अपूर्ण व दर्जाहीन आहे.पाईप,सिमेंट,लोखंड व इतर साहित्याचा दर्जा निकृष्ट व अपव्ययी स्वरूपाचा आहे.देखरेख करणारे अधिकारी संपूर्णपणे निष्क्रिय व उदासीन दिसत आहेत.

         उपसरपंच अशोक चौधरी यांनी दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी व अनेकदा कार्यकारी अभियंता,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग,चंद्रपूर यांना लेखी निवेदन देऊन सर्व बाबी मांडल्या होत्या. 

         तसेच 17 नोव्हेंबर 2025 पर्यंत योजना सुरू न झाल्यास 24 नोव्हेंबर 2025 रोजी आठवडी बाजार येथील पाण्याच्या टाकीवर चढून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता.

        तरीदेखील आजतागायत प्रशासनाने एकही पाऊल उचललेले नाही.यावरून स्पष्ट होते की संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यात आंतरिक संगनमत असून,जनतेचा निधी लाटण्याचा प्रकार सुरु आहे.हे शासनावरील विश्वासघाताचे आणि सार्वजनिक पैशाच्या दुरुपयोगाचे प्रकरण आहे.

म्हणूनच खालीलप्रमाणे ठोस मागण्या करीत आहे…‌

1. मौजा शंकरपूर येथील जल जीवन मिशन योजनेच्या संपूर्ण कामाची स्वतंत्र, उच्चस्तरीय व तात्काळ चौकशी करण्यात यावी.

2. चौकशीत दोषी ठरलेल्या अधिकाऱ्यांवर निलंबन व कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी.

3. कामाचा प्रत्यक्ष आढावा घेऊन, गावात पाणीपुरवठा सुरू होण्यासाठी निश्वित मुदत जाहीर करावी व त्याचे लेखी आश्वासन ग्रामपंचायतीला द्यावे.

4. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत (Blacklist) समाविष्ट करून पुढील सर्व कामांतून वगळावे.

5. या प्रकरणातील निष्क्रिय अधिकारी, अभियंते व पर्यवेक्षकांची जबाबदारी निश्चित करून शिस्तभंगात्मक कारवाई करावी.

           मौजा शंकरपूर येथील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून परिस्थिती कधीही नियंत्रणाबाहेर जाऊ शकते.शासनाच्या “हर घर नल, हर घर जल” या योजनेचा हेतू संपूर्णपणे मातीमोल झाला आहे. जर या तक्रारीवर तातडीने कार्यवाही झाली नाही,तर ग्रामस्थांसह मी स्वतः लोकशाही मार्गाने पण अत्यंत तीव्र आंदोलनास प्रारंभ करणार आहे असे निवेदनकर्ता उपसरपंच अशोक चौधरी यांचे म्हणणे आहे,याचबरोबर त्यांनी निवेदनाची गांभीर्याने नोंद घ्यावी असे म्हटले आहे.

            या पुढील सर्व कायदेशीर,प्रशासकीय आणि जनआंदोलनात्मक परिणामांची संपूर्ण जबाबदारी संबंधित विभागावर राहील.आपण या गंभीर प्रकरणाची तातडीने चौकशी करून जनतेचा विश्वास परत मिळवावा,असेही उपसरपंच अशोक चौधरी यांचे म्हणणे आहे.

         निवेदनाच्या प्रती ना.देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,ना.गुलाबराव पाटील मंत्री पाणीपुरवठा महाराष्ट्र राज्य,ना. अशोकजी उईके मंत्री आदिवासी विकास विभाग तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांना पाठविले आहे…