Home Maharashtra भातकुली ग्रामस्थांकडून अमरावती शहर गुन्हे शाखेतील पोलिसांचा सत्कार… — ट्रॅक्टर चोरीचा...

भातकुली ग्रामस्थांकडून अमरावती शहर गुन्हे शाखेतील पोलिसांचा सत्कार… — ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा उघड करून ₹ ४० लाखांचा माल हस्तगत….

अबोदनागो एस.चव्हाण 

  जिल्हा प्रतिनिधी अमरावती 

         दखल न्युज भारत 

अमरावती :- अमरावती शहर गुन्हे शाखेने केलेल्या प्रभावी तपासकामाबद्दल भातकुली ग्रामस्थांनी कृतज्ञतेचा भाव व्यक्त करत पोलिसांचा सत्कार केला.

       दिनांक ३० ऑक्टोबर २०२५ रोजी गुन्हे शाखा, अमरावती शहर यांनी भातकुली परिसरातील ट्रॅक्टर चोरी प्रकरणाचा यशस्वी तपास करून चोरी गेलेले पाच ट्रॅक्टर,तीन ट्रॉली,तीन दुचाकी आणि शेती उपयोगी अवजारे असा एकूण ४० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त केला होता. 

       या कारवाईत एकूण १२ गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला,ज्यामध्ये भातकुली येथील दोन ट्रॅक्टर,एक ट्रॉली आणि एक मोटरसायकल चोरीप्रकरणांचाही समावेश होता.

       या उल्लेखनीय तपासकार्याच्या मान्यतेसाठी दि. ६ नोव्हेंबर २०२५ रोजी श्री.संत गजानन महाराज मंदिर,भातकुली येथे महाआरतीनंतर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या प्रसंगी श्री.संत गजानन महाराज ट्रस्ट,भातकुली,तसेच ग्रामस्थांच्या वतीने अमरावती शहर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचा व पोलिसांचा शाल,श्रीफळ आणि श्री.संत गजानन महाराजांच्या प्रतिमेने सत्कार करण्यात आला.

        ग्रामस्थांनी पोलिसांनी दाखवलेल्या दक्षतेबद्दल व जनतेच्या विश्वासाला उतरलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या सत्कार सोहळ्यामुळे पोलिस आणि जनतेतील आपलेपणा व विश्वास अधिक दृढ झाला,असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.