Home Political आळंदीत ‘कै.द.ग.तटकरे वारकरी भवन’चे लोकार्पण :- खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते संपन्न…

आळंदीत ‘कै.द.ग.तटकरे वारकरी भवन’चे लोकार्पण :- खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते संपन्न…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : ज्ञानेश्वर माऊलींच्या पवित्र भूमीत ‘कै.द.ग. तटकरे वारकरी भवन’ या नव्या इमारतीचा लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला. या भवनाचे लोकार्पण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

            या प्रसंगी खासदार तटकरे म्हणाले, “ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीत उभे राहिलेले हे वारकरी भवन केवळ चिंतन-भजनाचे स्थळ नसून, वारकरी परंपरेतील श्रद्धा, संस्कार आणि सेवाभावाचा प्रसार करणारे प्रेरणास्थान ठरेल. या भवनाला माझ्या वडिलांचे नाव देण्यात आले, हे माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. या उपक्रमाबद्दल मी वारकरी संप्रदाय मंडळाचे मनःपूर्वक आभार मानतो.”

           त्यांनी पुढे सांगितले की, “या वारकरी भवनाच्या माध्यमातून भक्तांना माऊलींच्या सानिध्यात भक्तीरसाचा अनुभव घेण्यास एक सुंदर परिसर उपलब्ध झाला आहे. वारकरी परंपरेच्या संवर्धनासाठी भविष्यातही कार्य करण्याचा मी संकल्प करीत आहे.

            यावेळी तटकरे यांनी संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात जाऊन माऊलींचे दर्शन घेतले यावेळी मंदिर समितीच्या वतीने प्रमुख विश्‍वस्त योगी निरंजननाथ व विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे यांनी त्यांचे स्वागत केले.

           याप्रसंगी माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील, माजी आमदार सुनील टिंगरे, माजी सभापती डि.डि.भोसले पाटील, माजी नगरसेविका मंगलाताई वेळकर, रुपाली पानसरे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सौरभ गव्हाणे, निसार सय्यद व पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी तसेच कोकण दिंडी वारकरी संप्रदाय मंडळ, रोहा येथील वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.