दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : आळंदी शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या अनियमित पाणीपुरवठ्याच्या समस्येला लवकरच पूर्णविराम मिळणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या प्रश्नाची दखल घेत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे ठोस आश्वासन दिले.
आळंदीतील प्रस्तावित देहू फाटा येथील भक्तनिवास इमारत बांधकाम भूमिपूजन, संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर महाद्वार ते शनी मंदिर आणि पुंडलिक मंदिर येथील दगडी घाटासाठी पुनर्निर्माण कामाचे भूमिपूजन, ५० रुपये नाममात्र दरामधील ज्ञानेश्वरी ग्रंथाची पारायण प्रत प्रकाशन सोहळा समारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आळंदीत करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
आळंदी शहरात गेल्या चार पाच वर्षापासून पाणीपुरवठा अनियमित आणि अपुरा असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. विशेषतः अनेक प्रभागांमध्ये चार पाच दिवसांनी पाणी येत असल्याच्या तक्रारी वारंवार होत होत्या. यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर आळंदी देवस्थानचे विश्वस्त चैतन्य महाराज कबीरबुवा व शिवसेना शहरप्रमुख राहूल चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे आळंदी शहराचा सुरळीत पाणीपुरवठा व्हावा अशी मागणी करण्यात आली होती.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की आळंदी ही संत नगरी असून येथे भाविक आणि नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाल्याच पाहिजेत. पाणीपुरवठा हा नागरिकांचा प्राथमिक हक्क आहे. मी या विषयात स्वतः लक्ष घालतो आणि संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती उपाययोजना करण्याचे आदेश देत आहे. लवकरच आळंदीचा पाणीपुरवठा नियमित होईल. असे अश्वासन शिंदे यांनी दिले.
यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले, उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त चैतन्य महाराज कबीरबुवा, डॉ.भावार्थ देखणे, ॲड.रोहिणी पवार, धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे अध्यक्ष अक्षय महाराज भोसले, शिवसेना शहरप्रमुख राहूल चव्हाण, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, सुरेश वडगांवकर, माजी सभापती डि.डि.भोसले, डॉ.राम गावडे, माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, सागर भोसले, सचिन गिलबिले, दिनेश घुले, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर तसेच वारकरी भाविक व आषंदीकर ग्रामस्थ उपस्थित होते.



