दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या अलीकडील आळंदी दौऱ्यामुळे शहरातील शिवसेना (शिंदे गट) मध्ये नवचैतन्य संचारले आहे. शिंदे यांनी दिलेली विकासाची हमी आणि नागरिकांशी साधलेला संवाद यामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण झाली असून अनेक माजी नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी आणि युवा कार्यकर्ते आता शिंदे गटात प्रवेशासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे.
आळंदी दौऱ्यात शिंदे यांनी आळंदी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, घाटांचे पुनर्निर्माण, वाहतूक नियोजन आणि भाविक सुविधा सुधारणा या विषयांवर ठोस भूमिका मांडली. “आळंदीतील सर्व विकासकामे वेगाने पूर्ण होणार असून नागरिकांना दिलासा देणारा पाणीपुरवठा आराखडा लवकरच अमलात आणला जाईल,” असे आश्वासन त्यांनी दिले. या आश्वासनांमुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास वाढला असून, स्थानिक पातळीवर संघटनात्मक बळ वाढविण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.
शहरातील अनेक माजी नगरसेवक, समाजसेवक तसेच तरुण नेते आता शिंदे गटाच्या नेतृत्वाखाली काम करण्याची तयारी दाखवत आहेत. “उपमुख्यमंत्र्यांच्या विकासाभिमुख भूमिकेमुळे आळंदीच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण होणार आहे,” असा शिवसेना शहरप्रमुख राहूल ज्ञानेश्वर चव्हाण यांनी व्यक्त केला.
आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने आळंदीत संघटन मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू केले असून, लवकरच मोठ्या प्रमाणावर प्रवेशविधी सोहळा होणार असल्याची चर्चा सुरू आहे.



