दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : श्री ज्ञानेश्वर विद्यालयात पारंपरिक आणि सांस्कृतिक वातावरणात “दिवाळी पहाट” कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यालय परिसर दिव्यांच्या प्रकाशात आणि आकर्षक रांगोळ्यांनी उजळून निघाला होता. आनंद, एकता आणि संस्कृतीचा संगम अनुभवण्यासाठी शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व माऊलींच्या मूर्तिपूजनाने झाली. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, खजिनदार डॉ. दीपक पाटील, मंजुश्री वडगावकर, ज्येष्ठ विश्वस्त लक्ष्मण घुंडरे, सदस्य अनिल वडगावकर, तानाजी कुऱ्हाडे, प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, उपप्राचार्य किसन राठोड, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, अनिता पडळकर, अनुजायीनी राजहंस, प्रदीप काळे यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यालयाचे अध्यापक गणेश लिखे, विद्यार्थी कार्तिकी यादव, राजलक्ष्मी लिखे, वैष्णवी आंधळे, कार्तिक मोटकुळे यांनी सादर केलेल्या गायनाने वातावरण भक्तिमय केले. तालवादनात राज्यस्तरावर निवड झालेल्या चैतन्य कोठेकरने उत्कृष्ट सादरीकरण केले. विद्यालयाचे माजी विद्यार्थी व प्रसिद्ध गायक अभिषेक कांबळे, ओंकार कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वादन-गायनाने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
या वेळी सचिव अजित वडगावकर म्हणाले, “प्राचार्य सूर्यकांत मुंगसे यांच्या संकल्पनेतून आयोजित ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो. दिवाळी हा आनंद, ऐक्य आणि नवी उमेद जागविण्याचा सण आहे.”
खजिनदार डॉ. दीपक पाटील यांनी दिवाळी सणाचे सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व उलगडून सांगत सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य सूर्यकांत मुंगसे यांनी केले. माऊलींच्या पसायदानने कार्यक्रमाची सांगता झाली. शेवटी उपस्थितांसाठी दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले होते.



