सुधाकर दुधे
सावली तालुका प्रतिनिधी
“गाईच्या ओवाळणीने दिवाळीची पहिली पणती लागते आणि घराघरांत शुभतेचा वास दरवळतो!” अशी मंगल भावना मनात ठेवत सावली तालुक्यात सध्या वसुबारस सणाच्या उत्साहात न्हाऊन निघाले आहेत. शेतीप्रधान भारतात गाईला ‘माता’ मानले जाते. तिच्या उपकारांची आठवण ठेवून, कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे वसुबारस. यंदा वसुबारस शुक्रवार, १७ ऑक्टोबर रोजी साजरा होणार आहे.
बाजारपेठांत उत्सवी माहोल दिसून येतो आहे. गाई-वासरांच्या मूर्ती, पूजन साहित्य, सजावटीचे सामान आणि पारंपरिक वस्तूंची मोठी खरेदी सुरू आहे. गाय आणि वासराच्या मूर्ती दाखल झाल्या असून दिवाळींची सुरुवात करणाऱ्या या सणासाठी अनेकजण या मूर्ती खरेदी करत आहेत.
वाढत्या शहरीकरणामुळे व डिजिटल युगामुळे सध्या काही ठिकाणी घरीच यादिवशी गाय-वासराच्या मूर्तीची पूजा केली जाते. गाई-वासराच्या मूर्तीची विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असून, छोट्या ते मोठ्या अशा विविध आकारांच्या मूर्ती आकर्षण ठरत आहेत.
मातीच्यामूर्ती १०० रुपयांपासून तर फायबरच्या मूर्ती ७०० रुपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कामधेनू, गाय-वासरू, गाय-माणूस अशा विविध प्रकारांमध्ये या मूर्ती सजलेल्या दिसत आहेत. आकर्षक रंगसंगती, सुंदर कोरीव काम आणि टिकाऊपणामुळे फायबर मूर्तीना विशेष मागणी आहे. मूर्तिकार सांगतात, “शहरी भागात प्रत्यक्ष गाईचे पूजन शक्य नसल्याने मूर्तीपूजा हा सण साजरा करण्याचा सुंदर मार्ग या सणात दिसतो.
‘वसू’ म्हणजे धन आणि ‘बारस’ म्हणजे द्वादशी या संकल्पनेवर आधारित हा सण समृद्धी आणि संपन्नतेचा प्रतीक मानला जातो. पुराणकथांनुसार समुद्रमंथनातून पाच कामधेनू निर्माण झाल्या, त्यापैकी ‘नंदा’ नावाच्या गाईच्या स्मरणार्थ हे व्रत केले जाते, अशी आख्यायिका आहे.
या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा करून गोमातेचे महत्त्व अधोरेखित केले जाते. आजही वसुबारस सण पारंपरिक पद्धतीने घराघरांत साजरा होताना दिसतो. तर शहरी भागात प्रत्यक्ष गाईचे दर्शन दुर्मीळ झाल्याने, अनेक ठिकाणी मूर्तीपूजेच्या माध्यमातून हा सण साजरा केला जातो.
वरण-भात, पुरणपोळीचा नैवेद्य…
सकाळीच गायीचे पाय धुवून तिची पूजा करतात .या दिवशी गाईची कपाळावर हळद-कुंकू लावून पूजा केली जाते. वरण-भात आणि पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करून, निरांजनाने ओवाळून तिच्या आशीर्वादाने दिवाळीचा शुभारंभ होतो. या दिवशी तुपात तळलेले पदार्थ, गाईचे दूध, तूप आणि ताक यांचा वापर वर्ज्य मानला जातो. गाईचे पूजन करून घरातील स्त्रिया “गाईसारखी नितांत ममता, समृद्धी आणि शांती लाभो,” अशी प्रार्थना करतात.
गोसंवर्धन’ हाच खरा संदेश…
भारतीय संस्कृतीत गाईला मातेचा दर्जा दिलेला आहे. गाईचे तूप, दूध, गोमय अत्यंत औषधी मानले जाते. गेल्या काही वर्षांत गो-चिकित्सकेचे महत्त्वदेखील वाढले आहे. वसुबारस सणाला गाईच्या गुणांचा स्वीकार करावा व समाजाला बलवान करणाऱ्या या गोमातेप्रति कृतज्ञता व्यक्त करावी, या भावनेतून हे पूजन केले जाते. वसुबारस सणाचा खरा उद्देश म्हणजे गोमातेच्या पूजनातून तिच्या संवर्धनाचा आणि संरक्षणाचा संकल्प घेणे आहे.



