अबोदनगो एस.चव्हाण
जिल्हा प्रतिनिधी अमरावती
दखल न्युज भारत
चिखलदरा :- मेळघाटातील आदिवासी पट्ट्यात झोलाछाप डॉक्टरांनी मांडलेली आरोग्य व्यवस्थेची बाजारपेठ दिवसेंदिवस फोफावत चालली आहे. मध्यप्रदेशातून येणारे हे बिनडिग्री तथाकथित डॉक्टर चिखलदरा तालुक्यातील गावागावांत भटकंती करत आदिवासी रुग्णांवर औषधोपचार करत आहेत. त्यांच्याकडे कोणतीही वैद्यकीय पात्रता नसूनही ते रुग्णांना हायडोज इंजेक्शन, गोळ्या आणि सिरप देतात. या औषधांमुळे अनेक रुग्ण गंभीर अवस्थेत गेले असून, काहींचा मृत्यू झाल्याच्या घटना पुढे आल्या आहेत.
गावोगावी फिरणारे ‘आरोग्याचे भोंदू’…
लाखेवाडा, बोदु, बोरदा, हिल्डा, बिबा खारी, एकताई, पिपल्या, टेंबु, बुटिदा, सालिता, सुमिता, हतरु, कारजखेङा, डोमी, बारुगव्हाण, मेहरिआम, कोटमी, दहेन्दी, बगदरी, बामादेही, कोयलारी, कन्हेरी, कालापाठरी, गागरखेडा, पलस्या, आवागड, घाणा, खडिमाल, नवलगाव, बिच्छुखेडा, माडिझडप, पाचडोगरी, खंडुखैङा अशा अनेक गावांमध्ये हे झोलाछाप डॉक्टर सकाळ-संध्याकाळ फिरतात. “सर्दी-खोकला, ताप, पोटदुखी, सुई-गोळ्या देतो” असे सांगून हे लोक आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेतात.
गावातील आदिवासींना औषधांचे ज्ञान नसल्याने ते सहज फसतात. अनेकदा हे डॉक्टर औषधांची पाकिटे फोडून औषध उघड्या स्वरूपात देतात, त्यामुळे औषध एक्सपायर आहे की नविन, हे ओळखता येत नाही. अशा औषधांचा वापर केल्याने रुग्णांना उलट त्रास होतो, तरीही त्यांना योग्य उपचारासाठी रुग्णालयात पोहोचवले जात नाही.
हाय डोज औषधांचे दुष्परिणाम; मृत्यूच्या घटना दडपल्या जातात…
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, काही झोलाछाप डॉक्टरांनी रुग्णांना अतिहाय डोज इंजेक्शन दिल्याने काही जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र भीतीपोटी आणि जागरूकतेअभावी या घटना पोलिसांपर्यंत पोहोचत नाहीत. “डॉक्टर म्हणतो हे सामान्य औषध आहे, पण इंजेक्शन घेतल्यावर बेशुद्ध पडतो,” असे एक स्थानिक ग्रामस्थ सांगतात.
अलीकडेच मध्यप्रदेशात कफ सिरपमुळे २२ बालकांचा मृत्यू झाला होता. तरीदेखील त्याच भागातील औषधांचा वापर मेळघाटात सुरू असल्याचे उघड झाले आहे. या घटनेनंतरही आरोग्य विभाग आणि औषध प्रशासनाने अद्याप कोणतीही चौकशी केलेली नाही.
आरोग्य विभागाचे ठळक दुर्लक्ष…
चिखलदरा तालुका आरोग्य अधिकारी, काटकुभ येथील वैद्यकीय अधिकारी आणि जिल्हा वैद्यकीय अधिकारी .तालुका वैद्यकीय चिखलदरा अधिकारी या प्रकरणाकडे डोळेझाक करत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. मेळघाटातील आरोग्य केंद्रांवर डॉक्टर उपलब्ध नसल्याने आदिवासींना पर्याय म्हणून हे झोलाछाप डॉक्टरच दिसतात. शासनाच्या “आरोग्य तुम्हाच्या दारी” योजनेचा फायदा या बोगस डॉक्टरांनी घेतल्याचेही बोलले जात आहे.
स्थानिकांचा संताप – ‘कारवाई न झाल्यास आंदोलन’…
स्थानिक समाजसेवक आणि ग्रामस्थांनी प्रशासनाला लेखी तक्रारी दिल्या आहेत. “आरोग्य विभाग झोपला आहे, आमच्या भागात रोज लोक आजारी पडतात आणि बोगस डॉक्टर पैसे उकळतात. हे थांबवले नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
कारवाईची मागणी…
ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि पोलिस अधीक्षकांकडे तातडीने चौकशी करून संबंधित झोलाछाप डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच आदिवासी भागात नियमित आरोग्य शिबिरे भरवून खऱ्या डॉक्टरांची उपलब्धता वाढवावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
अबोदनगो एस. चव्हाण
मेळघाटातील आरोग्य व्यवस्था आधीच कमकुवत असून, अशा झोलाछाप डॉक्टरांच्या वाढत्या साखळीने आदिवासींचा जीव धोक्यात आला आहे. शासनाने आणि आरोग्य विभागाने याकडे गांभीर्याने पाहून तातडीने विशेष पथक पाठवून तपास करणे गरजेचे आहे.


