Home देशविदेश गुलामीच्या तीन बेड्या…

गुलामीच्या तीन बेड्या…

     माणूस जेंव्हा जन्मास येतो,तेंव्हा तो मुक्त असतो.परंतु जसा जसा मोठा होत जातो,तसे त्याच्या हाताला पायाला मेंदूला बेड्या पडत जातात.तेही संस्कारामुळे.

      विचार चिंतन केले तर असे दिसते की,माणूस जन्माला येताना जात धर्म वर्ग सोबत घेऊन येत नाही,तर या तिन्ही गोष्टी संस्कारामुळे त्याचेवर लादले जातात.आणि त्याला तर्क दिल्या जातो की,” आपण कुण्या जातीत ,धर्मात,वर्गात जन्माला यायचे ते माणसाच्या हाती नसून ते देवाच्या किंवा दैवाच्या हाती आहे.” असे सांगून सांगून माणसाच्या मनात आणि मेंदूत फिट्ट बसवल्या जाते.हे काम आई वडील,नातेगोते,गुरुमहाराज,कीर्तनकार कथाकार,पोथीपुरण,धर्म हे सतत करीत असतात,याचा अर्थ सतत खोटे,निरर्थक,निराधार बोलत असतात,आणि हा खोटेपणा शिकलेले पण मान्य करतात.कारण त्यांच्या मेंदूचीच जडण घडणं आपटून थापटून केलेली असते.

     खरे तर मी कोणत्या जातीत,कोणत्या धर्मात,कोणत्या वर्गात ( गरीब मध्यम श्रीमंत ) जन्माला यावे ? हा माझा निर्णय नव्हे.याचे स्वातंत्र्य मला नाही.हे तर माझ्या इच्छेविरुद्धच घडलेली गोष्ट आहे.हा एक प्रकारे अपघातच आहे.असे विचारांती आणि चिंतन केल्यावरच कळते.स्पष्ट होते,जाणीव होते.त्याआधी नाही कळत.म्हणून गुलामाला जो पर्यंत गुलामीची जाणीव होत नाही,तो पर्यंत त्याला गुलामीचे काहीच वाटत नाही.कारण आपल्या नशिबाचा किंवा देवाचा तो निर्णय आहे,आणि त्याच्या पुढे,म्हणजे नियतीपुढे कुणाचेही काहीच चालत नाही.अशा प्रकारचे शिक्षण,संस्कार माणसावर झालेले आहेत.म्हणून स्वातंत्र्य म्हणजे काय ? आणि गुलामी म्हणजे काय ? यातील फरकच माणसाला किंवा ” त्या ” गुलामाला कळत नाही.आले देवाजीच्या मना तेथे कुणाचे चालेना,ही म्हण त्याच्या मेंदूत ठासून बसवलेली असते.म्हणून गुलामी आणि स्वातंत्र्य यातील फरक माणसाला कळत नाही.म्हणून ठेविले अनंते तैसेचि रहावे, चिती असू द्यावे समाधान,असे म्हणून तो गप्प बसतो.परंतु आयुष्यभर तो कधीच समाधान नसतो.कारण तो गुलामीचे म्हणजे लाचारीचे जीवन जगत असतो.

      गुलामीचे जीवन ” याचा अर्थ माझ्या इच्छे विरुद्ध , मना विरुद्ध, विचारा विरूद्ध जीवन जगणे.आणि स्वातंत्र्य याचा अर्थ माझे विचार भावना ,माझ्यातील क्षमता,कौशल्य यांना संधी मिळणे,त्यानुसार जगता येणे.

   माझी इच्छा नसताना ,किंवा माझ्या इच्छ्यांचा विचार न करता , म्हणजे माझ्या स्वातंत्र्याचा विचार न करता ” मी कुण्या जातीत,धर्मात,वर्गात जन्माला यावे ? हे कुणी ठरविले ? का ठरविले ? खरे तर तो माझा हक्क आहे,देवाने किंवा स ट वी ने का हिरावून घेतला ? आणि मला का गुलाम केले.आणि तेही माझ्याशी लढाई न करता ? पूर्वीच्या काळी एक राजा दुसऱ्या राज्याशी लढाई करून त्यास हरवून त्यास जिंकून घ्यायचा,आणि पराजित राजा स आपला मंडलिक म्हणून आणि त्याचे सैन्य दास म्हणून आणि जनतेस प्रजा म्हणून वागवीत असे.म्हणजे जिंकणारा तो मालक आणि हरणारा तो नोकर गुलाम.अशी प्रथा होती.खरे तर माझ्या बाबतीत असेही काही घडले नाही.माझ्याशी कुणी लढाई करून मला जिंकून गुलाम केले नाही.आणि ” तू याच जातीत,धर्मात,वर्गात राहिले पाहिजे ” असे कुणी मला म्हटले नाही. तरी माझी इच्छा आहे की नाही ? हे न पाहता माझ्यावर जातीचे धर्माचे वर्गाचे बंधन म्हणजेच गुलामी होय.या तीन बेड्यांनी साऱ्यांना करकचून बांधले आहे. हालता येइना, ना डूलत येईना असे झाले आहे.

     खरे तर , जात धर्म वर्ग या तीन बेड्यांचा गुलामीचा प्रामाणिकपणे विचार आणि चिंतन केले तर,असे निदर्शनास येते की,या बेड्या देवाने किंवा दैवाने घातल्या नाहीत,तर मानवी समाजातील काही लोभी कोल्ह्यानी च या बेड्या घातल्या आहेत.याचे कारण सारा समाज एकसंघ एकजूट राहिला तर आपला स्वार्थ साधता येणार नाही.म्हणून हजारो जातीत यांचे विभाजन करावे,तुकडे पाडावे आणि त्यांच्यात भांडणे लावावीत,की जेणे करून आपण जो स्वार्थ साधत आहोत,यांचे शोषण करीत आहोत,त्याकडे यांचे लक्ष जाणार नाही.यांचे सारे लक्ष भांडणे मारामाऱ्या खुणखराबी यातच गुंतून असले पाहिजे.म्हणून या जातीच्या बेड्यांचे प्रयोजन आहे.हे जो पर्यंत जनतेस कळणार नाही,तो पर्यंत ते गुलामीतून मुक्त होणार नाहीत.

      धर्माचे पण असेच आहे.आधी देव निर्माण केला नंतर त्याची उपासना म्हणून धर्म निर्माण केले.आणि देव धर्म जात या संकल्पना गरीबी आणि श्रीमंती यातील अंतर विस्तारित करण्यासाठी यांचा वापर या कोल्ह्यानी केला.

      गरिबी आणि श्रीमंती का आहे ? याचे साधे सोपे गणित आहे.ते हे की,श्रीमंती आहे,म्हणून गरीबी आहे,आणि गरिबी आहे म्हणून श्रीमंती आहे.उदा.सपाट जमीन आहे.त्या जमिनीत एक मोठा खड्डा खोदला तर बाजूला एक मोठा मातीचा ढिगारा दिसेल,आणि एक मोठी दरी दिसेल.याचा अर्थ खड्डाच नाही खोदला तर सारी जमीन सारखीच दिसेल.असेच गरीबी श्रीमंती चे आहे.बहुसंख्य लोकांचे शोषण पिळवणूक काही मोजके लोक करतात,आणि स्वतःचे घर भरतात,आणि इतरांना भिकारी करतात.अफाट नफा,भ्रष्टाचार,काळाबाजार,साठेबाजी,श्रमिकांच्या श्रमाचा मोबदला कमी देणे यातून लाखो करडॉ कमवतात आणि श्रीमंत होतात.काही जाती ना तर मनूच्या कायद्याने शिक्षण संपती सत्ता च नाकारली म्हणून त्या गरीबच राहिल्या.विषमतेचे कायदे मनूने केले, हजारो वर्ष ते राबविल्या गेले.त्या कायद्यानं जातीचा,धर्माचा,देवाचा,आधार मिळाला म्हणून बहुसंख्यक समाज गरिबीत जीवन जगत आहे.आणि अल्पसंख्य लोक मजा मारीत आहेत,ऐश जीवन जगत आहे.अशी विषमता गांजिते भारता,म्हणून शाहीर दिगू ही वाहतो चिंता.

  तात्पर्य हे की,बहुजन समाजाच्या हाताला पायाला जात धर्म वर्ग या तीन बेड्या असल्यामुळे तो आजही गुलामीत खिचपत पडलेला आहे.म्हणून जोपर्यंत या तीन बेड्या तोडून फेकणार नाही,तो पर्यंत आपली गरीबी गुलामी नष्ट होणार नाही.आणि मुक्त होणार नाही.

       लेखक : दत्ता तुमवाड.

         सत्यशोधक समाज नांदेड.

दिनांक: 15 ऑक्टोबर 2025. फोन: 94 20 91 22 09.