Home Political स्थास्वसं’च्या निवडणुका राज्याच्या राजकारणाची फायनल!… — महायुती-महाआघाडी चे भविष्य ठरणार :-...

स्थास्वसं’च्या निवडणुका राज्याच्या राजकारणाची फायनल!… — महायुती-महाआघाडी चे भविष्य ठरणार :- हेमंत पाटील…

दिक्षा कऱ्हाडे 

वृत्त संपादिका 

मुंबई, दिनांक १४ आक्टोबर २०२५

        राज्यात दिवाळी नंतर होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्याच्या सध्याच्या राजकारणाची फायनल ठरेल,असा सूचक दावा इंडिया अगेन्स्ट करप्शन चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी मंगळवारी (ता.१४) केला. निवडणुकीनंतर महायुती आणि महाविकास आघाडीचे भविष्य ठरेल, विशेषतः शिवसेना (शिंदे), शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेस ची भूमिका महत्वाची राहील असे मत, पाटील यांनी व्यक्त केले.

          स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची स्पष्टता आल्या नंतर दोन्ही आघाड्यांमध्ये एकमेकांवर कुरघोड्या करण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना शिंदे गटातील एका बड्या नेत्याने तर मित्र पक्ष त्यांच्या विरोधात षडयंत्र करत असल्याचा दावा सुद्धा केला आहे. हे प्रकरण महायुतीतील खदखद दाखवणारे आहे. राष्ट्रवादी, शरद पवार गटाने स्वबळाची चाचपणी केली असल्याचे देखील बोलले जात आहे.

        विशेषतः स्थानिक पातळी वरील नेते निवडणुकीतील युती संदर्भात निर्णय घेतील, असं सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले आहे.सर्वच पक्षातील स्थानिक नेत्यांनी या संदर्भात निर्णय घेतला तर निम्म्याहुन अधिक ठिकाणी एकमेकांच्या पक्षावर कुरघोड्या करण्याचे राजकारण रंगेल, असे स्पष्ट मत पाटील यांनी व्यक्त केले. इकडे शिवसेना-मनसे एकत्रित आल्याने काँग्रेस अस्वस्थ आहे.

         काँग्रेस वेगळा मार्ग स्वीकारण्याच्या तयारीत आहे,असे संकेत देखील पाटील यांनी दिले आहेत.या सर्व राजकीय नाट्यात भाजप चे फावणार आहे. मोठ्या आणि महत्वाच्या महापालिका आणि जिल्हा परिषदा भाजपच्या हाती जातील, असे मत पाटील यांनी व्यक्त केले. शिंदे गटासाठी या निवडणुका शक्ती दाखवून अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी महत्वाच्या राहतील, असे पाटील म्हणाले.