Home Political शिरुर तालुक्यातील माजी जि.प. सदस्य शेखर पाचूंदकर पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश…

शिरुर तालुक्यातील माजी जि.प. सदस्य शेखर पाचूंदकर पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

मुंबई : शिरुर तालुक्यातील अनुभवी नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर (चंद्रशेखर) पाचूंदकर पाटील यांनी आज भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला. मुंबई येथील पक्ष कार्यालयात झालेल्या या प्रवेश सोहळ्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पाचूंदकर पाटील यांनी भगवा झेंडा हातात घेतला यावेळी आ.राहुल कुल, जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद उपस्थित होते.

         पाचूंदकर पाटील हे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय होते. २००२ साली त्यांनी जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून काम पाहिले असून, राष्ट्रवादीच्या शिरुर तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली होती.

         राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना त्यांनी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावली होती. मात्र, पक्षात फूट पडल्यावर पाचूंदकर यांनी शरद पवार गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वळसे पाटील आणि त्यांच्यातील मतभेद अधिक तीव्र झाले होते.

       आज अखेर त्यांनी या मतभेदांवर शिक्कामोर्तब करत भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रसंगी बोलताना पाचूंदकर म्हणाले,

        “शिरुर तालुका सुसंस्कृत तालुका म्हणून ओळखला जातो. माजी मंत्री बाप्पूसाहेब थिटे, रावसाहेब पवार, बाबुराव पाचर्णे, पोपटराव गावडे, सूर्यकांत पलांडे यांसारख्या सुसंस्कृत नेत्यांची परंपरा आम्हाला लाभली आहे. पण बाहेरच्या शक्तींनी आमच्या तालुक्यातील वंचित आणि शोषित घटकांवर अन्याय करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटकांना न्याय मिळावा म्हणून मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.”

         दरम्यान, पाचूंदकर यांच्या प्रवेशामुळे रांजणगाव गणपती परिसरासह संपूर्ण शिरुर तालुक्यात भाजपला नवे बळ मिळेल, अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे. स्थानिक पातळीवर या प्रवेशामुळे तालुक्यातील राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता निर्माण झाली आहे.