Home Social मराठी भाषा भावविश्वाला दिशा देणारी भाषा आहे : हभप चैतन्य महाराज लोंढे…

मराठी भाषा भावविश्वाला दिशा देणारी भाषा आहे : हभप चैतन्य महाराज लोंढे…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

पुणे : “मराठी ही केवळ संभाषणाची भाषा नसून ती भावविश्वाला दिशा देणारी, भक्तीमार्गाला बल देणारी आणि सामाजिक एकतेचे धागे बांधणारी भाषा आहे. ज्ञानेश्वरीतून संतांनी जेव्हा मराठीचे गौरवगीत गायले, तेव्हा त्यांनी तिला अमृताहूनही श्रेष्ठ ठरवले. कारण अमृताने फक्त देहाला अमरत्व लाभते, पण मराठी शब्दांतील ज्ञान आणि संस्कार आत्म्याला जीवनमूल्ये देतात असे प्रतिपादन आळंदी देवस्थानचे विश्वस्त हभप चैतन्य महाराज लोंढे यांनी केले.

         पुणे महानगरपालिका आयोजित अभिजात मराठी भाषादिनानिमित्त मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, या गोष्टीला ३ ऑक्टोबर २०२५ रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त जागर अभिजात मराठीचा या अनुषंगाने श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जन्मोत्सवानिमित्त “मराठी बोलु कौतुकें। परी अमृतातेहि पैजा जिंके ॥” या विषयावर आळंदी देवस्थानचे विश्वस्त व संत साहीत्याचे अभ्यासक हभप चैतन्य महाराज लोंढे याची प्रवचनसेवा आयोजित करण्यात आली होती.

         लोंढे महाराज यांनी आपल्या प्रभावी शैलीत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ओव्यांचा संदर्भ देत मराठी भाषेची महती उलगडून सांगितली, संत तुकाराम महाराजांच्या अभंगांतील ओवी, संत एकनाथ महाराजांची गाथा, बहिणाबाईंचे विचार आणि ज्ञानेश्वर माऊलींची भावकळा यांचा दाखला देण्यात आला.

         यामुळे श्रोत्यांच्या मनात मराठी भाषेविषयी आदर आणि अभिमानाची भावना जागृत झाली. “आजच्या युगात इंग्रजी, हिंदी आणि इतर भाषांचे महत्त्व नाकारता येत नाही, पण मातृभाषेची ओढ आणि तिचे जतन याकडे दुर्लक्ष होता कामा नये. मराठी ही आपल्या संस्कृतीचे ओळखपत्र आहे. ती बोलताना संकोच नको, उलट अभिमानाने मराठी बोलावी. असे लोंढे महाराज यांनी सांगितले.