रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
चिमूर :- रोटरी क्लब चिमूरतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शनिवारला राष्ट्रसंत तुकडोजी पत संस्था सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. तालुक्यातील नवोदय, शिष्यवृत्ती, दहावी, बारावी तसेच पदवी परीक्षेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे अध्यक्ष विनोद भोयर होते. प्रमुख मार्गदर्शक पंचायत समिती विस्तार अधिकारी स्वप्नील खांडेकर, तर प्रमुख पाहुणे संजय पंधरे उपस्थित होते.
मान्यवरांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना करिअर निवड, स्पर्धा परीक्षा व जीवनमूल्यांविषयी मार्गदर्शन केले. जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम यांद्वारे कोणतेही ध्येय साध्य करता येते, असा संदेश त्यांनी दिला. सोबतच स्पर्धा परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण देणारे श्री. आत्राम व श्रीरामे यांचाही यावेळी सत्कार झाला.
प्रास्ताविक पवन ताकसांडे यांनी केले, सूत्रसंचालन खुशाब रोकडे यांनी तर आभार प्रदर्शन राजेंद्र संगमवार यांनी केले.
या सोहळ्याला सचिव राकेश बघेल, कोषाध्यक्ष मंगेश हिंगणकर, माजी अध्यक्ष विशाल गंपावार, डॉ.महेश खानेकर, कैलास धनोरे, गुरुदास ठाकरे, अमर चट्टे, परेश दंदे, अभिजीत बेहते, श्रेयस लाखे आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालकवर्ग उपस्थित होते.



