माणूस माणसाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो? माणूस म्हणून की जात म्हणून? माणूस म्हणून की धर्म म्हणून? माणूस म्हणून की वर्ग म्हणून? हा महत्वाचा प्रश्न आहे.आणि याचे उत्तर असे की,माणूस हा माणसाकडे पाहताना प्रथम त्याकडे माणूस म्हणून न पाहता त्याची जात कोणती ? त्याचा धर्म कोणता ? आणि त्याचा वर्ग कोणता म्हणजे गरीब की श्रीमंत ? या दृष्टिकोनातूनच पाहत असतो.असे पाहण्याची सवय किंवा रूढी आहे.
प्रथमतः ओळखीची किंवा बिन ओळखीची जेंव्हा एकमेकास भेटतात तेंव्हा अभिवादन करतात,म्हणजे काहीतरी बोलण्याआधी किंवा ओळख करून घेण्या आधीच नमस्काराने सुरुवात होते.म्हणजे प्रथम अभिवादनच मुळी जात धर्माने होते.जसे की,जयभीम म्हटले की,हा बौद्ध आहे, जय लहुजी म्हंटले की हा मातंग,जय जिजाऊ जय शिवराय म्हंटले की,हा मराठा.जय मल्हार म्हंटले की,हा धनगर.अशी त्याची ओळख होते,आणि ती व्हावी असाच दृष्टिकोन या अभिवादनामागे असतो.यावरून जातव्यवस्था मजबूत होते.
यामुळे जातिनिर्मुलनाचा लढा यशस्वी होत नाही.कारण मुळात आपण एकमेकांस प्रथम दर्शनी भेटताना जात सोबत घेऊनच भेटतो,जात घरी ठेऊन न येता सोबतच घेऊन मिरवतो,आणि ती स्वाभिमानाची गोष्ट म्हणून.जातीचा आणि धर्माचा अभिमान स्वाभिमान जर आपण बाळगत असू,आणि त्यास श्रेष्ठ मानत असू तर मग माणूस म्हणून माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा निर्माण होईल? जेंव्हा समोरच्या माणसाला राम राम , शरनाथ म्हणून अभिवादन करतो तेंव्हा आपण जात पळतो,हे सिद्ध होते.
सलाम वालेकूम म्हणून त्याचा धर्म सांगतो,राधे राधे म्हणून त्याचा पंथ सांगतो,हरिबोल म्हणून धर्म सांगतो,याचा अर्थ आपल्या जातीची आणि धर्माची ओळखच अभिवादनाच्या शब्दातून पद्धतीतून करून देत असतो.अशी प्रथा असेल तर समाजवाद आणि राष्ट्रवाद रुजेल कसा? कारण एकसंघ समाज आणि राष्ट्राची अखंडता यास जातीचा आणि धर्माचा धोका आहे,हे अडसर आहेत.वर्गाचा पण धोका आहे.राष्ट्र आणि समाज यापेक्षा माणसाला तर फारच मोठा धोका आहे.तो असा की ,जातीदंगे आणि धार्मिक दंगे जेंव्हा होतात तेंव्हा त्यात माणसे मारली जातात,त्यांच्या मालमत्तेची हानी होते.जीवित आणि मालमत्तेची भयानक हानी होते.म्हणून जात आणि धर्म या संकल्पना यांचा इतिहास वाचला आणि यांचे परिणाम पहिले तर केवळ त्यात हिंसाचार,द्वेष,मत्सर,सूडभावना,यांची पेरणी होताना दिसते.हा अनुभव पाहता जात आणि धर्म आणि वर्ग या तीनही गोष्टी या माणसाच्या प्रगतीला आणि माणुसकीला पूरक नसून हानीकारक च आहेत,हे सिद्ध होते,म्हणून प्रत्येक माणसांनी जात आणि धर्माचा त्याग केला पाहिजे.वर्गाचा पण त्याग केला पाहिजे,कारण वर्गलढ्यातून पण मनुस्यसंहार होताना दिसतात.
उदा.नक्षलवाद,धर्मामुळे दहशतवाद,जातीवादातून हिंसाचार असे हे दुष्परिणाम माणसाला भोगावे लागताहेत.जातीय दंगली,धार्मिक दहशतवाद,वर्गीय नक्षलवाद यांच्या कारवाया मुळे दरवर्षी कित्येक माणसांचा बळी जातो आहे.हिंसाचारात भरच पडत आहे.
करिता माणसाचा दृष्टिकोन बदलणे ही वर्तमान काळाची गरज आहे.यासाठी प्रथम आपणास विचार बदलावे लागतील.वर्ग जात धर्माचे विचार,बदलावे लागतील.कारण हे वर्तमानकाळात निरुपयोगी आणि घोकादायक सिद्ध झाले आहेत.म्हणून जातीवादी आणि धर्माचे विचार सोडून माणुसकीचे विचार धरले पाहिजे.
आता सोडूनिया भेदभाव , बांधा प्रेम गाठी, कारण जगी सारी एक आहे जात मानवाची.म्हणजे इथून तिथून माणूस नावाचा प्राणी एकच आहे,डार्विनच्या सिद्धांतानुसार जीवसृष्टीतील वनस्पती,पक्षी आणि प्राणी या पैकी माणूस हा प्राणीच आहे,आणि प्राण्यात ज्या जाती आहेत,त्यातील माणूस नावाची एक जात आहे.याचाच अर्थ म्हणून हा एकाच जातीचा प्राणी आहे.माकडा पासूनच माणूस जन्मला.म्हणून त्याची जात एकच ती म्हणजे माणूस,आणि त्याचा धर्म एकच तो म्हणजे माणुसकी.याचा अर्थ माणसाचा ” माणुसकी ” हा धर्म म्हणजेच प्रेम,बंधुभाव आणि समता.
विचार बदला म्हणजे दृष्टीकोन बदलेल,विषमतेचे विचार सोडून समतेचे विचार स्वीकारले की,मग आपोआप जातीयत्ता जातीवाद जात नष्ट होईल,तसेच धर्मांधता,धर्मवाद ,धर्म नष्ट होतील.वर्ग पण नष्ट होऊन इथे समतेची व्यवस्था स्थापन होईल.
आपण जातीयवादी धर्मवादी वर्गवाडी वर्तन का करीत आहोत ? याचे कारण ही व्यवस्थाच तशी आहे म्हणून आपणास या व्यवस्थेनुसारच वर्तन करावे लागते.पण निर्धार केला ,आणि विचार बदलला तर दृष्टीकोन बदलेल.यासाठी आधी माणसाने माणसाकडे माणूस म्हणून पहायला शिकले पाहिजे,त्याकडे जात धर्म वर्ग म्हणून पाहण्याची प्रथा परंपरा रूढी बदलली पाहिजे..विचार बदलणे ही काही अवघड गोष्ट नाही.आपले विचार आपल्या हातात असतात,आपला दृष्टीकोन हा आपलाच असतो,पण यासाठी बदलण्याची इच्छा ,तय्यारी, ठाम निर्धार,म्हणजे दृढिच्छा,आत्मविश्वास,बदलावर निष्ठा,निर्भयता या गोष्टी आपल्यात आहेत ,यांचा वापर आपण करीत नाही.बऱ्याच क्षमता आणि कौशल्य माणसाच्या अंगी असतात,पण त्याचा वापर माणूस करीत नाही,म्हणूनच विचार बदलत नाहीत.विचार बदलत नाहीत म्हणून विषमतावादी व्यवस्था बदलत नाही.
आपणास खरोखरच सुखी आनंदी समाधानी शांततामय सहजीवन जगायचे असेल तर हैवानी दृष्टिकोन बदलून माणुसकीचा दृष्टिकोन बाळगावा लागेल.यासाठी माणसाने माणसाकडे आधी माणूस म्हणून पाहण्यास शिकले पाहिजे,त्याकडे त्याची जात धर्म वर्ग म्हणून पाहता काम नये.त्याची प्रथम सुरुवात अभिवादनाने केली पाहिजे.नमस्कार करताना समतेचा दृष्टिकोन असावा,म्हणजे समतेचे अभिवादन करावे,की ज्यातून आपली जात धर्म वर्ग याचे अनुकरण किंवा प्रदर्शन होता कामा नये.म्हणून सर्वांसाठी नमस्कार, जयजगत, जयभारत,जयसंविधान,जयक्रांती, या शब्दांचा अभिवादनासाठी उपयोग करणे योग्य राहील,असे मला वाटते.
महामानवांचे नाव घेणे अनुचित नाही,पण त्यातून जातीची ओळख होताना दिसते,ही अडचण आहे.म्हणून जात धर्म वर्ग याच्या पलीकडे जाऊन सर्वसमावेशक आणि परिवर्तन सूचक अभिवादन करणे गरजेचे आहे.यासाठी माणसाचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे.



