कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी..
पारशिवनी अंतर्गत सावनेर रोडवरील ग्रामीण रुग्णालयाच्या काही अंतरावर एका कारचालकाने अक्टिवा स्वार व्यक्तीस जबर धडक देऊन त्याला खाली पाडले व तलवार काढून सपासप अनेक घाव मारून जखमी केले होते.जख्मी व्यक्तीला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.
पण उपचारादरम्यान लालूचा मृत्यू झाला असल्याने पारशिवनी येथे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.यामुळे पारशिवनी शहराला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
सदर घटना पारशिवनी सावनेर रोडवर ग्रामीण रुग्णालयाच्या काही अंतरावर घडली.या खुनी संघर्षाबद्दल अधिक माहिती मिळवली असता असे कळले की मृतक लालू आसाराम एकनाथ वय वर्ष 42 रा.पारशिवनी सरोदे टोला येथील रहिवासी आहे.
तर आरोपी लाल्या राणू भोयर वय वर्ष 35 राहणार पालोरा सरोदे टोली येथील रहिवासी आहेत.
लालू एकनाथ व लाल्या भोयर यांची पारशिवनी शिवारात शेती आहे.दोघांचा शेताचा बांध एकच आहे.त्यामुळे लालू आसाराम एकनाथ यांनी लाल्या भोयर यांच्या शेताचा रस्ता बंद केला होता व शेतात पाणी सोडण्यावरून काही दिवसांपूर्वी यांचे जोरदार भांडण सुद्धा झाले होते.
याच भांडणाचा राग मनात धरून लाल्या राणू भोयर हा लालू आसाराम एकनाथ यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी संधीची वाट पाहत होता.
लाल्याला,लालूचा गेम करण्याची नामी संधी मिळाली आणि दिनांक २६ ऑगस्ट ला लाल्या भोयर लालूचा गेम करण्यासाठी पालोरा येथून आपली अल्टो कार क्रमांक एम.एच.३१/शि.पी.७४६९ च्या गाडीत एक धारदार तलवार घेऊन पारशिवनीत आला व लालू एकनाथ यांच्या मागावर फिरत होता.
सायंकाळी ४ .३० च्या सुमारात लालू भोयर आपल्या एक्टिवा क्रमांक एम एच ४०/सी यू ६५८९ ने सावनेर रोडनी आपल्या घरी जात असताना त्याच्या मागावर असलेल्या लाल्या भोयर यांनी पाठलाग करून रोडवरच लालू एकनाथ यास जोरदार धडक मारली व लालूस खाली पडल्यावर आपल्या जवळील धारदार तलवारीने लाल्याने लालूवर सपासप तलवारीने अनेक वार केले.या जीव घेण्या संघर्षात लालू आसाराम एकनाथ हा रक्ताच्या थारोळ्यात तडफडत पडला.पारशिवनी पोलिसांना सदर घटनेची सूचना मिळतात तात्काळ ठाणेदार राजेश कुमार थोरात आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले व जखमी लालूला ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरता दाखल केले.पण लालूची स्थिती गंभीर असल्यामुळे त्यास तात्काळ नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचाराकरता दाखल केले.
खाजगी रुग्णालयात लालूवर उपचार सुरू असताना त्यातच लालू आसाराम एकनाथ यांचा मृत्यू झाला.
आरोपी लाल्या राणू भोयर वय 35 वर्ष राहणार पालोरा सरोदे टोली यास पारशिवनी पोलिसांनी अटक करून अपराध क्रमांक ३७९/२५ कलम १०९ (१) बी.एन.एस.सहकलम ४,२५ भा.ह.का प्रमाणे गुन्हा नोंदविला.
पण अखेर लालू एकनाथ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यामुळे पारशिवनी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून कलमा वाढविल्या आहेत. आरोपी लाल्या भोयर यास तात्काळ केले स्थानबद्ध….
आरोपीस अटक केल्यानंतर त्याला जवळच्या पोलीस ठाण्यात हलविण्यात आले.कारण पारशिवनी येथील जखमी व मृत्यू पावलेल्या लालू एकनाथ यांच्या सरोदी टोली येथील नातेवाईक व समाज एकत्र येऊन काही विपरीत घडू नये व त्यामुळे आरोपीच्या जीवास धोका उत्पन्न होईल या कारणाने आरोपीला जवळच्या पोलीस ठाण्यात स्थलांतरित करण्यात आले होते.
पारशिवनी शहराला आले पोलीस छावणीचे स्वरूप….
पारशिवनी शहरात शेतीच्या वादावरून झालेला खुनी संघर्षातंर्गत जखमीचा उशिरा रात्री खाजगी रुग्णालयात झालेला मृत्यू या घटनेमुळे शहरात शांतता भंग होऊ नये म्हणून पारशिवनी पोलिसांनी पोलिसांची अतिरिक्त कुमावत तैनात केलेली होती.त्यामुळे शहराला छावणीचे स्वरूप आलेले होते.
पोलीस उपविभागीय अधिकारी रमेश बंरकते,पोलीस अधीक्षक ग्रामीण हर्ष पोद्दार व ठाणेदार राजेश कुमार थोरात आणि संपूर्ण पोलीस कर्मचाऱ्यांनी पारशिवनी शहरात शांतता कायम राहावी याकरिता ते अतिशय बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
यावेळी पोलिसां तर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले की शांतता कायम ठेवण्यास पोलिसांना सहकार्य करावे.
लालू एकनाथ यांच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार….
शेतीच्या वादातून झालेल्या खुनी संघर्षात बळी गेलेल्या लालू आसाराम एकनाथ यांच्या पार्थिवावर पारशिवनी येथील दोन क्रमांक शांती घाटावर आज दिनांक २७/८/२५ ला अंतीम संस्कार होणार असल्याची माहिती मिळाली आहे.



