Home देशविदेश सुख :- शारीरिक,मानसिक,भौतिक…

सुख :- शारीरिक,मानसिक,भौतिक…

      वैदिकसंत रामदास महाराज त्यांच्या ‘ मनाचे श्लोक ‘ या ग्रंथात म्हणतात की,” जगी सर्व सुखी असा कोण आहे,विचारी मना तूची शोधून पाहे ” याचा अर्थ या जगात कुणीच सुखी नाही.सुख तर प्रत्येकालाच हवे असते.त्याच साठी तर माणूस आपले आयुष्य झिजवित असतो.आपली बुद्धी श्रम पणाला लावतो,पण सारे आयुष्य सुखासाठी खर्च करूनही त्यास सुख मिळत नाही. सुखाविना तो तडफडत मरतो.यामुळे त्याला त्याचा जन्म वाया गेला ,असे वाटते.जन्मल्या पासून तर मरेपर्यंत माणूस निश्चिंत बेफिकीर कधीच राहत नाही.

        बालपणी खेळाची चिंता,तरुणपणी शिक्षणाची चिंता, प्रौढपणी बायको मुले संसार याची चिंता,म्हातारपणी आपल्या मुला मुलीचा संसार ठीक नाही होतो आहे,याची चिंता किंवा मुलास मुलीस मुले होत नाहीत ,याची चिंता,कमावलेल्या धनाची वाटणी कशी करू ? माझी मुले , सुना मला नीट वागवत नाहीत याची चिंता.थोडक्यात काय तर आयुष्यभर चिंता,चिंता,काळजी,काळजी.

      ही चिंता,काळजी मिटवून शांतीचे जीवन जगण्यासाठी देव धर्म गुरुमहाराज हे सारे करूनही चिंता काळजी काही केल्या पिछा सोडेचना.ज्या रामदास महाराजांनी म्हटले की, जगात सुखी कुणीच नाही,पण तेच त्यावर उपाय सांगतात की,रामभक्ती केली तर चिंता हरेल.तसेही करून पाहिले.तीर्थयात्रा,पूजाअर्चा, पोथी पुराण,भजन कीर्तन ,सारेकाही केले तरी माणसाची चिंता आणि काळजी काही जाईचना.

        चिंता आणि काळजी मुळे माणसाला सुख शांती आनंद समाधान या ज्या माणसासाठी आवश्यक चार गोष्टी आहेत.किंवा मनुष्य जीवनाचे हेच धेय्य आहे.यातच मानवी जीवनाचे सार्थक आहे,आणि सुख शांती आनंद समाधान जर माणसाला अख्ख्या आयुष्यात मिळणार नसेल तर माणसाचे जीवन सार्थकी लागणार नाही.

       जीवनाचे सार्थक नव्हे,तर जीवन हे निरर्थक होणार आहे,हे पण प्रत्येकास समजते,कळते.परंतु असे म्हणजे निश्चिंत काळजीमुक्त आपण जीवन का जगू शकत नाही ? याची कारणे माणूस शोधत नाही.शोधले तर ते कारण म्हणजे ‘ संसार ‘ हेच दुःखाचे मूळ कारण आहे.आणि संसाराचे दुःख याचे कारण म्हणजे ” मोह ” आहे.म्हणून कुणी संसार सोडून पाहिला,संन्याशी झाले,तरी ते सुखी झाले नाहीत.मोह सोडून पाहिला,तरी सुख मिळेना,संसाराने शारीरिक सुख मिळाले तर मानसिक सुख मिळेना,उलट चिंता वाढली.मोह संसार त्यागाने मानसिक सुख मिळाले तर शारीरिक प्राकृतिक सुख मिळेना,म्हणून चिंता.

      तर शेवटी काय ? तर चिंता,भय,अनिश्चितता,परावलंबन,याचना,परिस्थितीचा गुलाम.स्वयंसिद्धता जीवनात नाहीच.मानवी जीवनाचे जे मुख्य ध्येय्य ते म्हणजे ,सुख शांती आनंद,समाधान हे उभ्या आयुष्यात कधी प्राप्त होतच नाही.

     हे असे का होतेय ? याचा शोध घेतला तर असे कळून येईल की,माणसाची जी भौतिक परिस्थिती आहे,त्यातून त्याची शारीरिक मानसिक अवस्था निर्माण होते,आणि ही अवस्था ,व्यवस्थेवर अवलंबून असते,जसे की,आर्थिक आणि सामाजिक विषमतेची व्यवस्था असेल,म्हणजेच वर्गीय जातीय धर्मीय व्यवस्था असेल तर माणसाची मानसिकता पण तीच बनेल,त्याचे मन विचार यांना विषमतेचेच संस्कार मिळतील.आणि शारीरिक सुख हे त्याचा वर्ग म्हणजे गरीब की श्रीमंत की मध्यम ? यावरून त्यानुसार त्याला तसे शारीरिक सुख मिळेल.याचा अर्थ मनाचे म्हणजे मानसिक सुखदुःख हे शारीरिकसुख आणि भौतिक परिस्थितीवर अवलंबून असते.आणि भौतिक परिस्थिती ही व्यवस्थेवर अवलंबून असते.याचा अर्थ विषमतावादी रचना असेल तर त्यात वर्ग असणार,आणि ज्याचा जो वर्ग त्यानुसार त्याचे शारीरिक आणि मानसिक सुखदुःख असणार आहे.आणि समतावादी व्यवस्था असेल तर माणसाची मानसिकता,विचार समतेच्या वातावरणात समतेचेच असतील.समतावादी समतेच्या व्यवस्थेत प्रेम,बंधुभाव,सर्वधर्म समभाव,सर्व विचार आणि सभ्यतांचा आदर, मैत्री,करूणा, विवेक,विश्वास ही नैतिकता निर्माण होईल,टिकेल,स्थिर राहील.याचा उपयोग सर्वासाठी शांतीमय आनंदी जीवन जगण्यासाठी होईल.

       लेखक : दत्ता तुमवाड.

        सत्यशोधक समाज नांदेड.

दिनांक: 16 ऑगस्ट 2025. फोन: 94 20 91 22 09.