अण्णाभाऊंचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबात झाला. म्हणून त्यांना दारिद्र्याचे सर्व प्रकारचे चटके सोसावे लागले. त्यामुळे ते कम्युनिस्ट विचाराकडे आकर्षित झाले. अण्णाभाऊ भाकरीच्या शोधात निघाले, त्यासाठी त्यांनी जे मिळेल ते काम करून पोटाची भूक शमविण्याचा प्रयत्न केला. स्वतःची भूक भागवत असताना आपल्या गावाकडच्या मैनेची आठवण त्यांना सतावीत होती. म्हणूनच त्यांना ” माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होतिया काहीली” हे गीत सुचले, आणि त्यांनी ते गाऊन दाखवले, कारण हे गीत केवळ त्यांच्यासाठीच नव्हते तर त्यांच्यासारख्या लाखो कुटुंबीयांसाठी होते. इतरांचे दुःख ते माझे दुःख असे मानणारे अण्णाभाऊ साठे होते. अण्णाभाऊ जेव्हा मी कामगार झाले, तेव्हा त्यांना कळले की संघटित होऊन संघर्ष केल्याशिवाय भाकर मिळत नाही, आणि त्याकाळी सर्वहारा वर्गासाठी लढणारा एकच पक्ष होता तो म्हणजे कम्युनिस्ट पक्ष. या पक्षाची विचारसरणी आणि कार्य त्यांना पटले म्हणून त्यांनी तो पक्ष स्वीकारला. त्या पक्षांच्या नेतृत्वाला अण्णाभाऊ तील लेखणीचा शोध लागला म्हणून त्यांनी अण्णा भाऊला साहित्यिक बनविले, तसेच अण्णाभाऊतील गायक आणि कलाकार सापडला म्हणून कम्युनिस्ट पक्षांनी त्यांना ” लाल बावटा “या नावाने कलापथक स्थापन करून त्यांच्यातील क्षमता आणि कौशल्य यास त्यांना त्यांच्या पक्षाने संपूर्ण स्वातंत्र्य आणि वाव दिला, म्हणून अण्णाभाऊ साठे हे साहित्यरत्न साहित्यसम्राट आणि लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध होऊ शकले. अण्णाभाऊंना माहीत होते कारण त्यांनी जनतेची नाडी ओळखली होती, जनतेला पोटाची भूक आहे त्याबरोबरच मनाची पण भूक आहे आणि ह्या दोन्हीही भूक भागवण्यासाठी साहित्य निर्माण केले पाहिजे त्याबरोबरच गाणी लोकनाट्य याद्वारे त्यांचे मनोरंजन पण केले पाहिजे, लोकांना भाषण वाचन तर आवडतेच पण त्याहीपेक्षा मनोरंजन हे जास्त आवडते म्हणून मनोरंजनातून विचार देण्याचे काम किंवा जबाबदारी अण्णाभाऊंनी त्या पक्षात घेतली. आणि ती जबाबदारी निष्ठेने पार पाडले. त्यात कसल्याही प्रकारचा बडेजावपणा किंवा लबाडी केली नाही. कारण त्यांचे ध्येय आणि त्यांचे विचार हे अगदी स्पष्ट होते, किंतु परंतु हे काहीच नव्हते.
समाजात आर्थिक विषमता आणि सामाजिक विषमता आहे याचा अभ्यास त्यांना झाला होता, गरीब मध्यम श्रीमंत ही वर्गीय समाजव्यवस्था असून ती शोषणावर आधारित आहे, आणि हे शोषण जोपर्यंत बंद होणार नाही तोपर्यंत हे वर्ग अस्तित्वात राहणारच आहेत, आणि हे वर्ग एकमेकांचे शोषण करणारच आहेत आणि अन्याय अत्याचार होणारच आहेत, म्हणून वर्ग विहीन व्यवस्था जोपर्यंत निर्माण होणार नाही तोपर्यंत गरिबी हटणार नाही हे अण्णाभाऊंना पक्के समजले होते, जे कम्युनिस्ट पक्षाचे ध्येय होते तेच अण्णाभाऊंची ध्येय बनले, म्हणून ते कॉम्रेड झाले,
अण्णाभाऊंनी क्रांतीची मशाल तर हाती घेतलीच पण क्रांती घडवून आणायची असेल तर आधी माणसांचे विचार बदले पाहिजे आणि ते विचार बदलण्यासाठी परिवर्तनवादी गाणी साहित्य सिनेमा यात बदल झाला पाहिजे म्हणजेच त्यांचे असे बदलले पाहिजेत असे अण्णाभाऊंना समजले म्हणून त्यांनी परिवर्तनवादी गाणी लोकनाट्य आणि साहित्य लिहायला सुरुवात केली. गाणी केवळ मनोरंजनात्मकच गाईला जात होती तसेच साहित्य पण मनोरंजनात्मकच होते, ही गाणी हे साहित्य ह्या सिनेमा यात फक्त मध्यम आणि श्रीमंत वर्गाचे चित्रण केल्या जात होते, यात गरीब वर्गा च्या दुःखाचे किंवा आनंदाचे चित्रण केल्या जात नव्हते, नेमके हेच अण्णाभाऊंनी बदलले, मनोरंजन आणि साहित्य क्षेत्रात त्यांनी अमलाग्र परिवर्तन घडवून आणले, गरिबीचे नुसते चित्रणच केले नाही तर त्याला विचारांची जोड दिली, गरीबीची कारणे सांगितली, अन्याय अत्याचाराचा शोध घेतला, गरिबीचे मूळ काय आहे हे त्यांनी आधी शोधले आणि तोच शोध त्यांनी गाणी साहित्य लोकनाट्य याद्वारे जनतेपुढे मांडले, त्याचा परिणाम असा झाला की, लाखो लोक रस्त्यावर उतरले, क्रांतीसाठी रस्त्यावरची लढाई करण्यासाठी सज्ज झाले त्यांचे नेतृत्व अण्णाभाऊंनी केले. अण्णाभाऊ केवळ लेखक कवी किंवा शाहीरच नव्हते तर ते कृतिशील लेखक कवी शाहीर होते म्हणजेच कार्यकर्ते उत्पन्न होते आणि नुसते कार्यकर्तेच नव्हते तर नेतृत्व पण करत होते. याचा अर्थ अण्णाभाऊंचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते.
अण्णाभाऊंना माहित होते की ही लोकशाही भांडवलदारांची लोकशाही आहे म्हणजेच भांडवली लोकशाही आहे म्हणजेच पुंजीवादी लोकशाही आहे, निवडणुकीच्या मार्गाने फक्त पुंजीवादी भांडवलदार पैसेवाले श्रीमंत धनिकच निवडून येतात गरीब निवडून येऊ शकत नाहीत, आणि गरिबी पण हटणार नाही, स्वातंत्र्य जरी मिळाले आणि गरिबांना मतदानाचा अधिकार जरी मिळाला तरी हेच गरीब श्रीमंतांनाच निवडून देणार आणि सत्ताही श्रीमंतांचीच असणार आणि श्रीमंत लोक हे आपली संपत्ती चे जपवणूक करण्यासाठी सत्तेचा वापर करणार, आपल्या आणि आपल्या मालमत्तेच्या संरक्षणासाठी पोलीस आणि अर्धवल सैनिकांचा वापर करणार, भांडवलशाही अर्थव्यवस्थेत पोलीस सैन्य न्यायालय संसद आणि लोकशाहीच्या सर्व संस्था ह्या भांडवलदारांच्याच बटीक होऊन त्यांची सेवा करणार आणि त्यांचे संरक्षण करणार आणि त्यांच्या उपयोगाचीच कायदे करणार त्यांची अंमलबजावणी करणार हे त्यांना माहीत होते, अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य या प्राथमिक या गरज आहेत त्या साऱ्याच लोकांच्या पूर्ण होणार नाहीत फक्त मोजक्या पुढे पुढे करणाऱ्या आणि कंत्राटदारांच्या गरजा पूर्ण होतील, श्रीमंत वर्ग हा अधिकच श्रीमंत होणार आणि गरीब वर्ग अधिकच गरीब होणार हे त्यांना माहीत होते, म्हणूनच त्यांनी जेव्हा 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले त्याच्या दुसऱ्या दिवशीच, दहा हजार कामगारांचा मोर्चा काढला, आणि नारा दिला की,” ही आजादी झुटी है, देश की जनता भूकी है.”आणि त्यांचे हे भाकीत आजही म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्षे झाली तरी 80 कोटी लोकांना पाच किलो धान्य फ्री मध्ये द्यावे लागते कारण ते उपाशी मरू नयेत म्हणून, भारतीय संविधानामध्ये शासनावर तशी जबाबदारी टाकलेली आहे म्हणून. वस्त्राच्या बाबतीत भारत स्वावलंबी जरी झालेला असला तरी अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी झालेला असला तरी अजूनही अन्न वस्त्र जशी श्रीमंत लोकाला मिळतात तशी किंवा मध्यमवर्गाला मिळतात तशी किंवा अन्न वस्त्र घरे शिक्षण आरोग्य हे श्रीमंत वर्गाला जशी मिळतात तशी नाही तर नाही पण कमीत कमी मध्यमवर्गीय त्यातल्या त्यात कर्मचारी वर्ग सारखे तरी या मूलभूत गरजांची परिपूर्ती झाली पाहिजे ती पण झाली नाही. म्हणूनच स्वातंत्र्य मिळूनही या मतदानाचा हक्काचा उपयोग गरिबांना सत्तेत जाण्यासाठी होत नाही त्यासाठी केवळ आरक्षणाच्या नावाने त्यांच्या तोंडाकडे बघावे लागते ही व्यवस्था तसेच मूलभूत गरजा न देणारी ही व्यवस्था, कारण अजूनही रोजगार महागाई शिक्षण आरोग्य ह्या समस्या संपलेल्या नाहीत, म्हणूनच अण्णा भाऊ मिळालेल्या स्वातंत्र्याला बेगडी स्वातंत्र्य म्हणत होते. भासमान स्वातंत्र्य, खोटे स्वातंत्र्य, भासमान लोकशाही, खोटी लोकशाही असे म्हणत होते, ते 77 वर्षानंतरही खरे ठरले. याचा अर्थ कम्युनिस्ट तत्त्वज्ञान आणि अण्णाभाऊंची दूरदृष्टी स्पष्ट दिसते.
भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे केवळ जीर्ण झालेल्या घराची डागडुजी करून त्यात राहायचे अशी व्यवस्था होय, किंवा असे विचार होत, परंतु जीर्ण झालेली इमारत पाडून त्या ठिकाणी अशी नवीन इमारत तयार करायची की ज्यात वर्ग नसणार आहेत, जाती नसणार आहेत, आणि धर्मांधता नसणार आहे. ही कम्युनिस्ट विचारसरणी यांना भावना पटली म्हणूनच ते त्या पक्षाचे सदस्य झाले आणि शेवटपर्यंत राहिले, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहिले, एखाद्या महामंडळाचे अध्यक्ष पद मिळण्यासाठी किंवा मंत्रिपद मिळवण्यासाठी त्यांनी पक्ष बदलला नाही की आपले विचार सोडले नाहीत म्हणजेच पक्षनिष्ठा विचारनिष्ठा हा त्यांचा स्थायीभाव होता म्हणूनच ते महामानवाच्या यादीत बसले.
व्यवस्था परिवर्तनाचे विचार जे लोक करतात ते विचारा मला देण्यासाठी अहोरात्र झटतात, त्या विचाराचा प्रचार प्रसार करतात, त्यासाठी लोकांना संघटित करतात, कार्यप्रवण बनवितात, त्या विचाराशी एकनिष्ठ राहतात, आणि आपले सर्वस्व म्हणजे काय वाचा मने आणि तन मन धनाने समाजसेवा करतात, म्हणजेच आपले जीवन समर्पित करून ते व्यवस्था परिवर्तनासाठी पणाला लावतात तेच लोक महामानव बनतात. आणि महामानवांचे विचार हे दिशादर्शक ठरतात.
बाबासाहेबांनी असलेल्या व्यवस्थेतच सामाजिक समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, कारण अस्पृश्यता जातिभेद धर्मभेद यासाठी आर्थिक समता आणलीच पाहिजे असे नाही , कारण वर्ग आणि वर्ग भेद हा विषय आर्थिक व्यवस्थेसंबंधी आहे परंतु अस्पृश्यता जात धर्म हे विषय माणसाच्या मानसिकतेशी संबंधित आहेत, म्हणून लोकांची समज मानसिकता दृष्टिकोन बदलला की अस्पृश्यता जातीयता धर्मांधता नाहीशी होईल, असे बाबासाहेबांना वाटत होते म्हणून त्यांनी आर्थिक समतेची व्यवस्था आणण्याच्या आधी सामाजिक समता आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, आधी सामाजिक समता आली की मग आर्थिक समता यायला ती पूरक होईल असे त्यांचे मत होते, असे त्यांचे विचार होते, आणि आर्थिक समता आल्याशिवाय सामाजिक समता येणे शक्य नाही किंवा आर्थिक समतेची व्यवस्था ही सामाजिक विषमता दूर करण्यासाठी पूरक ठरते त्यासाठी आधी आर्थिक सत्ता, आर्थिक समता , आणणारी व्यवस्था याचा विचार केला पाहिजे, कारण वर्ग विहीन समाजव्यवस्था निर्माण झाली की, त्या व्यवस्थेत म्हणजे समतावादी व्यवस्थेत अस्पृश्यता जातीयता धर्मांधता जोर धरणार नाही असे मार्क्स म्हणतो, मार्क ्सचे विचार म्हणजेच कम्युनिस्ट विचार होत, आणि हेच विचार अण्णाभाऊंना सत्य वाटले म्हणून ते कम्युनिस्ट झाले, म्हणूनच त्यांना ” कॉम्रेड अण्णाभाऊ साठे ” असे म्हणतात.
कला तर सारेच कलाकार सादर करीत असतात परंतु त्या कलेचा आधार जर ” विचार ” नसला, म्हणजेच विचार विहीन कला जर असे तर ती कला प्रभावी होऊ शकत नाही म्हणजेच परिणामकारक होत नाही, साहित्याचे पण असेच आहे, सारेच साहित्यिक असतात पण त्या साहित्याला विचाराची जोड नसेल तर ते साहित्य नपुसकच म्हटले पाहिजे. किंवा दिशाहीन म्हटले पाहिजे, किंवा फ्रुटलेस म्हटले पाहिजे. अशी कला असे साहित्य समाजाच्या काय उपयोगाचे? अशी कला असे साहित्य असावे की जे सर्वसामान्य लोकांमध्ये त्यांच्या विचारांमध्ये त्याच्या वर्तनामध्ये बदल घडवेल. आणि असेच अण्णाभाऊंचे साहित्य आणि कला प्रभावशाली होती कारण की परिवर्तनवादी होती म्हणून. क्रांतिकारी होती म्हणून. आणि जे क्रांतिकारक विचाराचे कार्यकर्ते आहेत त्यांनाच ” कॉम्रेड ” म्हणतात.
जग बदल घालुनी घाव गेले सांगून मला भीमराव, या त्यांच्या रचनेमुळे परिवर्तनवादी कार्यकर्त्यांमध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे तो म्हणजे अण्णाभाऊ मार्क्सवादी होते की आंबेडकरवादी होते ? हा प्रश्न पडतो, परंतु या संभ्रमामध्ये न पडता बाबासाहेब आणि मार्क्स हे दोघेही व्यवस्था परिवर्तनवादी होते, फरक एवढाच की, व्यवस्था परिवर्तनाचे त्यांचे मार्ग अलग अलग होते, दोघांनाही समाजवादी व्यवस्था आणायची होती, म्हणजे दोघांचे ध्येय एकच होते, पण ही समाजवादी समतावादी व्यवस्था आणण्याचे मार्ग म्हणजे बाबासाहेबांचा मार्ग हा लोकशाही मार्ग होता तर मार्क्स च मार्ग क्रांतिकारी होता, फरक एवढाच. परंतु दोघेही व्यवस्था परिवर्तनवादीच विचाराचे होते, म्हणून या वादात न पडता सर्व कार्यकर्त्यांनी समान आणि किमान कार्यक्रम घेऊन एकत्र लढाई लढली पाहिजे. ज्यांना जो मार्ग सोपा वाटतो किंवा योग्य वाटतो या मार्गाने जरूर जावे, पण मार्क्सवाद आणि आंबेडकरवाद यात भेद करून आपण आपली संघटित शक्ती विघटित करू नये, एवढे किमान पथ्य परिवर्तनवादी कार्यकर्त्यांनी पाळले पाहिजे, तरच काहीतरी बदल शक्य आहे, अन्यथा हे भांडवलवादी विचाराचे लोक, विषमतावादी विचाराचे लोक परिवर्तनवादी कार्यकर्त्यांच्या संघटनेत फूट पाडण्यासाठी तयारच आहेत. आपली ताकद क्षीण करण्यासाठी अनेक प्रकारची प्रलोभणे आपल्यापुढे ठेवण्यात येतात, याबद्दल आपण जागरूक असले पाहिजे. मार्क्सवाद आणि आंबेडकरवाद या भांडणात पडता कामा नये. तुम्हाला ज्या मार्गाने समतावादी व्यवस्था आणायची आहे त्या मार्गाने आणावे, पण आपापसात भांडणे करण्यामध्ये आपण आपली शक्ती वाया घालू नये. या माझ्या विचाराला अण्णाभाऊंचीच मी पुष्टी देत आहे, ती म्हणजे अशी की, अण्णाभाऊ कॉम्रेड असून सुद्धा, बाबासाहेबांच्या विचारांचा आदर केला, कारण जग बदल घालुनी घाव याचा अर्थ घाव घातल्याशिवाय जग बदलणार नाही असे पण बाबासाहेबांना अभिप्रेत होते, नेमके हेच अण्णाभाऊंनी बाबासाहेबांच्या मुलांना समजून सांगितले आहे, याचा अर्थ मतदान आणि भांडवली लोकशाही मधून जर व्यवस्था बदलणार नसेल, तर यावर पण घाव घालावा लागणार आहे, असा ह्या गीताचा अर्थ होतो. एवढे जरी समजले तरी आपल्यातील वादा नाहीसा होईल, याबद्दल मला खात्री आहे.
शेतकरी शेतमजूर कारखान्यातील कामगार कुशल कामगार असंघटित कामगार संघटित मजूर गोरगरीब जनता जी दारिद्र्यात गरीबीत कितपत पडलेले आहे अशी वंचित जनता ही बहुजन जनता असून अल्पजन यांची पिळवणूक करीत आहेत यांचे श्रम चोरीच आहेत अफाट नफा कमवून, दिवसेंदिवस महागाई भ्रष्टाचार काळाबाजार बेकारी साठेवाडी गुन्हेगारी व्यसनाधीनता जुगार याद्वारे बहुजनांचे शोषण चालू आहे, भरमसाठ वस्तू कर सेवा कर लावू नये त्याद्वारे बहुजनांचे शोषण सरकार करीत आहे, करातून मिळालेले लाखो करोडो रुपये हे श्रीमंतांच्या हितासाठीच वापरल्या जात आहेत त्यातील थोडासा हिस्सा गरिबांना देऊन बहुजनांना शांत करण्याचे काम आरक्षणाद्वारे होत आहे, हे पण आपण विसरता कामा नये, केवळ आरक्षणाच्या तुकड्यावर विसंबून या तुकड्यासाठी भांडणे मारामाऱ्या करून घेण्यापेक्षा त्यावर तोडगा काढून आपण पुढे जाणे महत्त्वाचे आहे, म्हणजेच असलेल्या असलेल्या या विषमतावादी व्यवस्थेमधील ज्या काही सोयी सवलती असतील त्याचा वापर करून आपणास परिवर्तन घडवायचे आहे, आणि असे परिवर्तन की, ज्यामुळे विषमतावादी समाज व्यवस्था बदलून समतावादी समाज व्यवस्था स्थापन होईल. अर्थात यासाठी कार्ल मार्क्स आणि शाहू फुले आंबेडकर यांचे विचार आपणास आर्थिक समता आणि सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी दिशादर्शक आहेत, यांच्या तत्त्वज्ञानाचा उपयोग बदलत्या परिस्थितीनुसार करून आपणास समतेचे ध्येय साध्य करायचे आहे, ही युक्ती अण्णाभाऊंनी आपणास दिलेली आहे.
अण्णाभाऊंचे चरित्र, त्यांचे विचार, त्यांचे कार्य, त्यांचे समर्पित जीवन यापासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे, प्रेरणा जर आपण घेणार नसाल तर अण्णाभाऊ ची जयंती केवळ एक औपचारिकता होईल.
समाज परिवर्तन हे जर आपले ध्येय असेल तर त्यासाठी फार मोठा तत्त्ववेत्ता व्हायला पाहिजे किंवा मोठमोठे डिगऱ्या घ्यायला पाहिजे असे काही नाही, हे सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, गाडगे बाबा, अण्णाभाऊ साठे, यांच्याकडे पाहूनही किंवा त्यांचा आदर्श घेऊ नये आपणास परिवर्तन घडविता येते, हे शिकले पाहिजे.” पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कष्टकऱ्यांच्या तळहातावर ठरलेली आहे ” केवळ या एकाच वाक्यावर तेवढे मोठे तत्त्वज्ञान निर्माण झालेले आहे, हे एकच वाक्य अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टी आणि बुद्धिवाद याचे दर्शन घडते. असा शोध लावण्यासाठी डिग्री घेतली पाहिजे असे काही नाही, हे अण्णाभाऊ कडे पाहून आपण शिकले पाहिजे. म्हणून सुशिक्षित आणि अशिक्षित असा भेदभाव न करता, अशिक्षितांचे विचार आणि कार्य यांचा पण तेवढाच सन्मान होणे गरजेचे आहे. कारण शाळेत न गेलेल्या गाडगे बाबांचे नाव एका विद्यापीठाला दिला जाते, सावित्रीबाई चे नाव एका विद्यापीठाला दिले जाते, यावरूनच शैक्षणिक भेदभाव करता कामा नये, हे आपण चिखले पाहिजे.
अण्णाभाऊ साठे नि शिवाजी महाराजांवर पोवाडा रचून रशियात गाईला आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, तसेच बाबासाहेबांवर गीत रचून ते गीत गायले ही सुद्धा त्यांची कृतज्ञता बाबासाहेब बद्दलची आहे, याचा अर्थ जे महामानव आहे त्यांनी परिवर्तन घडवून आणण्यासाठी व्यवस्था बदलण्यासाठी आपले जीवन अर्पित केले त्यांचा त्याग आणि त्या त्यागाला सलामी म्हणून अण्णाभाऊंनी पोवाडा आणि हे गीत रचले आणि गायले. हे पण विसरून चालणार नाही.
एकंदरीत अण्णाभाऊ चे विचार, त्यांचा त्याग, त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व, आणि जन्मल्यापासून ते मरेपर्यंत त्यांच्या वाट्याला आलेले कटकटीचे जीवन तरी त्यातूनही त्यांनी परिवर्तनाची मशाल पेठ ठेवली, हा त्यांचा आदर्श आपण घेऊन आपणासही त्यांच्यासारखे काही करता येईल का ? असा विचार, असे चिंतन त्यांच्या जयंतीनिमित्ताने व्हावे, हीच अपेक्षा.
लेखक : दत्ता तुमवाड
सत्यशोधक समाज नांदेड
दिनांक : 14 ऑगस्ट 2025. फोन : 94 20 91 22 09.



