Home Maharashtra शेतकऱ्यांच्या समस्येकडे शासनाचे दुर्लक्ष, निराकरण न झाल्यास आंदोलन उभारणार :- आमदार रामदास...

शेतकऱ्यांच्या समस्येकडे शासनाचे दुर्लक्ष, निराकरण न झाल्यास आंदोलन उभारणार :- आमदार रामदास मसराम यांचा इशारा…   

पंकज चहांदे

तालुका प्रतिनिधी

 दखल न्यूज भारत

देसाईगंज :- आरमोरी विधानसभा क्षेञासह संपुर्ण गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या धानाच्या चुकाऱ्या सह बोनस व खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण करुन शेतकऱ्यांची सर्रास लुट सुरु असुन याकडे शासन पूर्णतः दुर्लक्ष करित आहे. विधानसभेत वारंवार प्रश्न उपस्थित करुनही शासन याकडे गांभिर्याने लक्ष देत नाही, २५ ऑगष्ट पर्यंत शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे व बोनस ची रक्कम जमा न झाल्यास तिव्र आंदोलन उभारणार असा इशारा आरमोरी विधानसभा क्षेञाचे आमदार रामदास मसराम यांनी पञकार परिषदेच्या माध्यमातुन दिला.                                          

      देसाईगंज तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना धान खरेदी विक्री सोसायटी च्या माध्यमातुन शासकिय हमीभावाचा लाभ मिळावा यासाठी नविन खरेदी विक्री सहकारी संस्था निर्माण करुन शासनाच्या उद्धिष्ठांचे लक्षांक गाठण्यासाठी या क्षेञाचा आमदार म्हणून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला, या भागातिल शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी या सहकारी संस्थांना मोठ्या प्रमाणात धानाची विक्री केली, मात्र खरिप हंगामा सह रब्बी हंगामाच्या धानाचे चुकारे अद्याप पर्यंत पुर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्याने हजारो शेतकरी त्रस्त असुन हंगाम कसा करायचा? हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. विधानसभेत या विषयी वारंवार प्रश्न उपस्थित केल्यानंतरही शासन याकडे दुर्लक्ष करत आहे.

       देसाईगंज तालुक्यात ३ कोटी ३६ लाख रुपयाचे चुकारे अद्याप शिल्लक असुन गडचिरोली जिल्ह्यात २० कोटी ३१ लाख रुपयाचे चुकारे शिल्लक आहेत. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांच्या हिताचे शासन असा कांगावा करणाऱ्या शासनाने खताचा कृञिम तुटवडा निर्माण केला आहे. २०२५ च्या खताच्या आवंटनात १७३९५ मैट्रिक टन खताचे आवंटन असतांना केवळ ११४७० मैट्रिक टन खताचा पुरवठा झाल्याने कृषीकेन्द्र चालक प्रतिबैग १०० रुपये ज्यादा दराने खत विक्री करुन शेतकऱ्यांची सर्रास लुट करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, ही अतिशय गंभिर बाब असुन २५ ऑगष्ट पर्यंत शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण न झाल्यास तिव्र आंदोलन उभारणार असा इशारा आमदार रामदास मसराम यांनी दिला.

    या प्रसंगी कॉंग्रेस चे जेष्ट नेते परसराम टिकले, तालुका अध्यक्ष राजेन्द्र बुल्ले, धनपाल मिसार , दिलिप घोडाम, विजय पिल्लेवान, अरुण कुंभलवार, कमलेश बारस्कर, विकास प्रधान, कैलाश वानखेडे, सागर वाढई यांचेसह कॉंग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.