दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी – आळंदी शहरात अनधिकृत जाहिरात फलक व फ्लेक्समुळे होणाऱ्या दृष्यार्थ व वाहतूक अडथळ्यांचा विचार करून आळंदी नगरपरिषद प्रशासनाने विशेष स्वच्छता व अतिक्रमण विरोधी मोहीम राबवून मोठी कारवाई केली. या मोहिमेत एकूण १९५ अनधिकृत फलक व बॅनर्स हटविण्यात आले.
दिनांक ४ ऑगस्ट रोजी झालेल्या मोहिमे अंतर्गत,पुणे रोड ते पीएमटी बस स्टॉप दरम्यान ९० फलक, देहू फाटा ते साखरे रे महाराज पेट्रोल पंप दरम्यान १०५ फलक असे एकूण १९५ फलक हटविण्यात आले.
या फलकांमध्ये रस्ते, फूटपाथ, वीज खांब, सार्वजनिक भिंती यांसारख्या ठिकाणी लावलेले आणि वाहतुकीस अडथळा ठरणारे फ्लेक्स व बॅनर्सचा समावेश होता. याआधीही नगरपरिषदेने यासंदर्भात वारंवार सूचना व इशारे दिले होते, मात्र नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे प्रत्यक्षात कारवाई करण्यात आली.
मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले की, “शहराच्या स्वच्छतेसाठी व सौंदर्यासाठी अनधिकृत जाहिरात फलकांना मुळीच जागा नाही. नागरिकांनी परवानगीविना फलक लावू नयेत, अन्यथा कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल.” पुढील टप्प्यात वडगाव रोड व प्रदक्षिणा मार्ग या भागांत विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहितीही प्रशासनाने दिली आहे.



