ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : नवजीवन कॉन्व्हेंट अॅण्ड इंग्लिश प्रायमरी स्कूल, साकोली येथे शालेय हाऊस क्रीडा उपक्रमांचे भव्य उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात अध्यक्षा प्राचार्या भारती व्यास, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.लोकांनद नवखरे, डॉ.जितेंद्र कुमार ठाकूर, डॉ.सुनील चतुर्वेदी, शाळा व्यवस्थापक विनोद किरपान, प्रशासकीय अधिकारी सतिश गोटेफोडे आणि पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर यांनी उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी केलेली भव्य परेड, चारही हाऊस गटांचे कॅप्टन व उपकॅप्टन यांचा सत्कार, तसेच शपथ विधी यामुळे संपूर्ण वातावरण प्रेरणादायी झाले.
प्राचार्या भारती व्यास यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना संघभावना, प्रामाणिकता व खेळातील शिस्त याचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी हाऊस कॅप्टन म्हणून पुढे येण्याचा अभिमान व्यक्त केला आणि त्यांनी आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडण्याची शपथ घेतली.
प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले की, खेळ ही केवळ शारीरिक क्रियाशीलता नसून ती मानसिक ताकद, नेतृत्वगुण आणि सामूहिकतेचा विकास करणारी एक प्रभावी प्रक्रिया आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हाऊस क्रीडा उपक्रमाचे प्रभारी, क्रीडा विभाग आणि शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांच्यात आनंद व उत्साहाचे वातावरण होते.



