Home Social ध्यास फौंडेशनमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी…

ध्यास फौंडेशनमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी…

दिनेश कुऱ्हाडे 

  उपसंपादक 

आळंदी : ध्यास फौंडेशनच्या अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या महर्षी वाल्मिकी बालक मंदिर, महर्षी वाल्मिकी विद्यावर्धिनी व डॉ.माधवराव सानप विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.

        या विशेष दिनानिमित्त आयोजित बालसभेला प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थी प्रतिनिधी ओम खराडे, गायत्री पायघन, संस्थेच्या संचालिका‌ अक्षता कुलकर्णी व उपशिक्षिका स्मिता रंधवे उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात अतिथींच्या स्वागताने झाली. त्यानंतर टिळक व साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन सादर केले.‌

        गौरी पाटोळे हिने कार्यक्रमास अनुमोदन दिले. शाळेतील विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर माहितीपर सादरीकरण केले. विद्यार्थ्यांमध्ये समृद्धी मोहिते, आर्वी सोनवणे, रुद्र यादव, साई दाभाडे, अजिंक्य तुरे आदींचा समावेश होता.

        कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी मनीषा दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली केले. सूत्रसंचालन वैदेही उंबरकर हिने तर प्रास्ताविक ओम खराडे व गायत्री पायघन यांनी केले. बालवाडीतील विद्यार्थ्यांनी टिळक व साठे यांची वेशभूषा साकारून विशेष आकर्षण ठरले. संस्थेच्या संचालिका अक्षता कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. आभारप्रदर्शन गणेश चाळक याने केले. शेवटी पसायदान सादर करून कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती व सामाजिक जाणिवा अधिक दृढ झाल्या.