ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : साकोली शहरामध्ये प्रसिध्द असलेल्या मुख्य तलावाची पाळ शुक्रवार ०१ ऑगस्टला मध्य भागाहून पहाटे ४:३५ दरम्यान फुटली.
पाळी खालची पिचींग व दगड,तलाव सौंदर्यीकरण करण्याच्या उद्देशाने बांधकाम विभागाने काढल्याने व मागील वर्षी पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष द्यावे,अन्यथा फार मोठी हानी होणार अशी सुचना देऊनही हलगर्जीपणा केला व तलावाची पाळ फुटण्याचा हा भयानक प्रकार घडला आहे असा आरोप माजी नगरसेवक ॲड. मनिष कापगते यांनी केला आहे.
तातडीने घटनास्थळी नगरपरिषदेचे सीओ मंगेश वासेकर,पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर हे आपल्या ताफ्यांसह आले.वेळीच तलावाची पाळ फुटलेल्या जागेवर आणि साकोली-चंद्रपूर राज्य महामार्गावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
साकोलीचा मुख्य तलावाच्या पाळी अंतर्गत मागील वर्षी ऑगस्ट २०२४ ला खालून पाणी वाहत होते,त्यातच येथील मत्स्यव्यवसाय जलतरण संस्था अध्यक्ष रामचंद्र वलथरे यांनी सहकारींच्या मदतीने ८२ पोते लावून हा भाग बुजविला होता.
पाच दिवसांपूर्वी तलाव सौंदर्य करीत असलेले बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी पाळीवरील पिचींग दगड जेसीबीने खोदल्याने ही पाळ फुटली.
आता ही पाळीचा आकार २५ ते ३० फूट वाढला असून अब्जो लिटर साचलेले १००% टक्के पाणी निघून हा तलाव रिकामा होत आहे.
सदर तलावातील पाणी हे ४५० एकर मधील शेतात जाऊन असंख्य शेतकऱ्यांची शेती वाहून गेली.यात साकोली ते चंद्रपूर राज्य महामार्ग बंद झाला.
येथे पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
उपसंपादक ऋग्वेद येवले यांनी घटनास्थळी जाऊन संपूर्ण माहिती घेतली असता माजी नगरसेवक ॲड.मनिष कापगते यांनी सांगितले की,पाटबंधारे विभागाला मागील वर्षीच ही सतर्कतेची सुचनाही दिली होती.
मात्र,संबंधित विभागाने दूर्लक्ष केल्याचा आरोप केला व शेकडो शेतकऱ्यांना शेतातील पिके वाहून गेली याला आता कोण जबाबदार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मुख्य शहर तलाव प्रभाग साकोली येथील पाळ अचानक फुटली ही माहिती प्राप्त होताच नगरपरीषद मुख्याधिकारी मंगेश वासेकर,पोलीस ठाणे निरीक्षक महादेव आचरेकर,माजी नगरसेवक ॲड. मनिष कापगते,हेमंत भारद्वाज यांसह अनेक सामाजिक कार्यकर्ते येथे आले.
इतिहासात पहिल्यांदाच या अथांग तलाव जलाशयाची पाळ फुटली आहे.यावेळी हजारो जनतेने येथे गर्दी केली होती,पोलीस प्रशासनाने तातडीने या संवेदनशील स्थळावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
या अति संवेदनशील प्रकारावर जनतेने ओरड करु नये किंवा या तलाव फुटलेल्या जागेवर जवळपास कुणीही जाऊ नये असा इशारा पोलीस निरीक्षक एम.पी.आचरेकर व सीओ मंगेश वासेकर यांनी जनतेला दिला असून तलावातील पाणी राज्य महामार्गावर जात आहे.
साकोली पोलीस ठाणे सहाय्यक निरीक्षक आशिष बोरकर,उपनिरीक्षक प्रशांत वडूले,नायक चंदू थेर,संदीप रोकडे,आशिष परचाके,सचिन कापगते,मधुकर शेंडे,अनिफ राऊत,शिवा मरकाम,युवराज वरकडे,महेश नैताम,गणेश बरैया,प्रमोद बागडे,धनविजय गणविर,वाहतूक पोलीस काशिनाथ झंझाळ यांनी काल दिवसभर चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
तर सीओ मंगेश वासेकर,पोलीस निरीक्षक एम.पी.आचरेकर यांनी जनतेला सुचना दिली की,कुणीही तलाव पाळीवर मनोरंजनासाठी जाऊ नये.
कारण तीव्र पाण्याच्या प्रवाहाने माती सरकून कुणी प्रवाहात वाहून जाऊ नये या संबंधाने सावधगिरी बाळगावी असा जनतेला इशारा दिला आहे.
बाॅक्स…
“मागच्या वर्षी पाळीला भगदाड पडले होते.मी तातडीने जलतरणचे मत्स्य बांधवांना घेऊन वेळीच ८२ पोती लाऊन बुजविले.
पण पाच दिवसाआधी या पाळीचे पिचींग दगड जेसीबीने खोदल्याने ही भयंकर घटना घडली आहे.आता ४५० एकरातील शेतकऱ्यांचे पीक वाहून गेले त्यांच्या नुकसानीला कोण जबाबदार.?
संबंधित दोषींकडून नुकसान भरपाई संपुर्ण वसुल केली जाईल.मुख्य तलावातील १००% टक्के पाणी साठा रिकामा झाला असून या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करीत आहो,अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येणार व याला संबंधित विभाग सर्वस्वी जबाबदार राहणार”असल्याबाबत मत व्यक्त केले.



