Home Social श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्या मंदिरात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती...

श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्या मंदिरात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी…

दिनेश कुऱ्हाडे 

  उपसंपादक 

आळंदी :– श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिरात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती सहशालेय उपक्रमांतर्गत उत्साहात साजरी करण्यात आली.

       या निमित्ताने शाळेत बालसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, मुख्याध्यापक प्रदीप काळे, शरीफजी शेख, सागर कुंभार, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       बालसभेचे अध्यक्षपद इ.४ थ चे समर्थ सुंदर शिंदे यांनी भूषवले, तर विराज रानवडे हे प्रमुख पाहुणे होते. त्यांच्या निवडीला राधिका वाशिंबे हिचे अनुमोदन लाभले. विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर करून पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने करण्यात आली.

       गार्गी पाटील हिने प्रास्ताविक केले. इ. १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांनी टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित प्रभावी भाषणे केली. वर्षा काळे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यकार्याचे विवेचन केले, तर राहुल चव्हाण यांनी टिळक यांच्या ग्रंथ संपदेची माहिती दिली.

        सचिव अजित वडगावकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत दोन्ही थोर व्यक्तिमत्वांचे कार्य आणि योगदान उलगडून सांगितले. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ, स्व. ताराचंद वडगावकर यांचे योगदान व नालंदा-तक्षशिला विद्यापीठाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करत संत ज्ञानेश्वर माऊली संस्थानच्या विविध उपक्रमांची माहितीही दिली.

       मुख्याध्यापक प्रदीप काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आकांक्षा घाडगे व रुद्र जाधव यांनी केले. श्रुती शिंदे हिने पसायदानाच्या गायनाने कार्यक्रमाची सांगता केली.

         बालसभेचे यशस्वी नियोजन प्रतिभा भालेराव यांनी केले. वर्षा काळे, निशा कांबळे, वैशाली शेळके, राहुल चव्हाण, गजानन राठोड यांनी कार्यक्रमात मोलाचे सहकार्य केले.