Home Maharashtra आळंदीत घरगुती गॅस स्फोटाची घटना;आगीवर वेळीच नियंत्रण मिळवून मोठा अनर्थ टळला…

आळंदीत घरगुती गॅस स्फोटाची घटना;आगीवर वेळीच नियंत्रण मिळवून मोठा अनर्थ टळला…

दिनेश कुऱ्हाडे 

  उपसंपादक 

आळंदी :– आळंदीतील दत्त मंदिर रस्त्यावर हरिपाठ उद्यानासमोरील गल्लीमध्ये आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली. लहु विठ्ठल कोकाटे यांच्या राहत्या घरात ही घटना घडली. यामुळे परिसरात मोठा गोंधळउडाली उडाला.

        घटनेची माहिती मिळताच आळंदीचे मा.उपनगराध्यक्ष सागर बोरूंदिया यांनी अग्निशमन दलाला तत्काळ सूचित केले. अग्निशमन विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले, मात्र मार्गावर पार्क करण्यात आलेल्या वाहनांमुळे त्यांना अडथळा निर्माण झाला. तरीही जवानांनी प्रसंगावधान राखून घटनास्थळी पोहोचत आगीवर नियंत्रण मिळवले.

१) घरातून दोन गॅस सिलेंडर सुरक्षित बाहेर काढल्यामुळे संभाव्य मोठा स्फोट टळला.

२) किचनमधील साहित्य पूर्णतः जळून खाक झाले.

३) एक व्यक्ती किरकोळ जखमी, जीवितहानी टळली.

         मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन जवानांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली यामध्ये लिडिंग फायरमन प्रसाद बोराटे, फायरमन अमित घुंडरे, फायरमन सिद्धार्थ गावडे, फायरमन साहिल काळे, वाहनचालक विनायक सोळंकी व स्थानिक नागरिकांनी देखील मदतीसाठी पुढाकार घेतला.

         घटनास्थळी आळंदी पोलीस ठाण्याचे अधिकारी मच्छिंद्र शेंडे व इतर कर्मचारी उपस्थित होते. सध्या आगीचे नेमके कारण अस्पष्ट असले तरी, गॅस गळतीमुळे स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

        या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र अग्निशमन दलाच्या वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे मोठी दुर्घटना टळली.