Home शैक्षणिक ग्रामगीता महाविद्यालयात नवागत विद्यार्थ्यांसाठी दीक्षारंभ कार्यशाळा संपन्न…

ग्रामगीता महाविद्यालयात नवागत विद्यार्थ्यांसाठी दीक्षारंभ कार्यशाळा संपन्न…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी 

 चिमूर, २३ जुलै २०२५ 

       ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर येथे कला आणि विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय दीक्षारंभ (इंडक्शन) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना त्यांच्या नवीन शैक्षणिक प्रवासासाठी मार्गदर्शन करणे आणि महाविद्यालयातील विविध सुविधा, शैक्षणिक पर्याय व नव्या शिक्षण धोरणांची ओळख करून देणे हे होते.

        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ.सुनंदा एस. आस्वले होत्या. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या सुविधा, अभ्यासक्रमातील नवकल्पना आणि नवीन शैक्षणिक धोरणाची व्याप्ती यावर सखोल माहिती दिली.

        या कार्यशाळेच्या संयोजक डॉ.वरदा व्ही.खटी होत्या. यावेळी रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.एच.डी. आनंदे यांनी विद्यार्थ्यांना कौशल्याधारित अभ्यासक्रमांची माहिती देत शिक्षणाशी व्यावसायिकता जोडण्याचे महत्त्व स्पष्ट केले. शारीरिक शिक्षण विभागाचे डॉ.संदीप सातव यांनी शारीरिक शिक्षणाचा अभ्यासक्रमातील सहभाग व त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम सांगितले.

           कार्यक्रमात गणित विभाग प्रमुख प्रा.एन.डी. ढोरे आणि ईव्हीएस विभाग प्रमुख डॉ.बिजन कुमार शिल यांनी बी.एससी. आणि बी.ए. अभ्यासक्रमातील मुख्य व ऐच्छिक विषयांची माहिती विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगितली.कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना आपापल्या कार्याची ओळख करून दिली. 

        कार्यशाळेचा समारोप संवादात्मक सत्राने झाला, जिथे विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. ही कार्यशाळा अत्यंत ज्ञानवर्धक, संवादात्मक आणि प्रेरणादायी ठरली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील तंत्रज्ञ व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले.