दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : देशी गोवंशाच्या संरक्षण व संवर्धनासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, देशी गाय संशोधन केंद्रासाठी ७१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. भविष्यातही या कार्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. देशी गोवंशाच्या जतनासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी महाविद्यालयाच्या डॉ. शिरनामे सभागृहात ‘देशी गोवंश जतन व संवर्धन सप्ताहा’चा समारोप सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंत्री भरणे बोलत होते.
या कार्यक्रमात विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, बँकेचे अध्यक्ष डॉ.दिगंबर दराडे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने आणि प्रमुख शास्त्रज्ञ सोमनाथ माने आदी मान्यवर उपस्थित होते.
मंत्री भरणे म्हणाले, “देशी गायींप्रती समाजात आत्मीयता असून ग्रामीण भागात त्या महत्वाच्या आहेत. कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी देशी गोवंश संरक्षण व संवर्धनाचे महत्त्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे. पुरस्कार मिळाल्यानंतर जबाबदारी वाढते, त्यामुळे या कार्याचा प्रसारही व्हावा.”
विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सांगितले की, “देशी गोवंश सप्ताहातून विविध गायींच्या जातींबाबत माहिती मिळाली असून भविष्यात गोशाळांना भेटी देऊन संवर्धनाच्या कार्याचा अभ्यास केला जाईल.”
गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी सांगितले की, “राज्यात गोमातेला राज्य मातेचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. प्रत्येक तालुक्यातील गोशाळांना १५ ते २५ लाखांचे अनुदान, तर गोवंश परिपोषणासाठी दरमहा १५०० रुपयांचे सहाय्य दिले जात आहे. गोसंवर्धन, गोपर्यटन, गोआधारित शेती, गोसाक्षरता अशा विविध उपक्रमांतून ‘गो-टेन’ अभियान राबवले जात आहे.” या सोहळ्यात देशी गोवंश संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींचा सन्मानही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.



