Home Maharashtra जवराबोडी येथील शाळेची इमारत जीर्ण अवस्थेत..  — कोणत्याही क्षणी दुर्घटना होण्याची...

जवराबोडी येथील शाळेची इमारत जीर्ण अवस्थेत..  — कोणत्याही क्षणी दुर्घटना होण्याची शक्यता… 

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी…

        चिमूर तालुक्यातील जवराबोडी येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत जीर्ण अवस्थेत असून कोणतेही क्षणी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत 2023 पासून वेळोवेळी तक्रारी देऊन सुद्धा जिल्हा शिक्षण अधिकारी तसेच तालुका गटविकास शिक्षणाधिकारी व जनप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याने येथील विद्यार्थी जीव मुठीत घेऊन या पडक्या इमारतीमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यामुळे काही अनपेक्षित घडल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न येथील नागरिकांनी केला आहे. 

          जिल्हा परिषद शाळा जवराबोडी येथे चार वर्ग असून दोन शिक्षक कार्यरत आहेत. शाळेमध्ये 21 विद्यार्थी शिक्षण घेत असून शाळेची इमारत मोडकळीस आल्याने त्यांच्या भविष्य बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शाळेच्या इमारतीच्या भिंतीला भेगा पडलेल्या असून इमारतीचे छताचे सिमेंटचे तुकडे खाली पडत आहेत. पर्यायी व्यवस्था नसल्याने या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना या इमारती मध्येच शिक्षण घ्यावे लागत आहे. आणि शिक्षकांनाही जीव मुठीत घेऊन विद्यार्थ्यांना शिकवावे लागत आहे. 

          याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनी शिक्षण अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष आणि निवेदनाद्वारे सन 2023 पासून इमारत बांधकामाच्या सूचना देऊन बांधकामाचे इस्टिमेट सुद्धा पाठविण्यात आले आहे. याबाबत अनेक तक्रारी शिक्षण अधिकाऱ्यांना जिल्हा परिषद सदस्यांना तसेच क्षेत्राच्या आमदारांना गावकऱ्यांकडूनही देण्यात आल्या आहेत. तरीही तीन वर्षे होऊन सुद्धा याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्या जात आहे. एकीकडे समाज मंदिरे मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी या क्षेत्रामध्ये मोठमोठा निधी उपलब्ध केल्या गेला. आणि क्षेत्रामध्ये मोठी समाज मंदिरे उभी केल्या गेली. परंतु शिक्षणाच्या बाबतीत दुर्लक्ष का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. 

       त्यामुळे या शाळेमध्ये शिकविणारे शिक्षक व विद्यार्थ्यांच्या जीवनाची हमी कोण घेईल असा प्रश्न निर्माण झाल्याने जवराबोडी येथील नागरिकांनी गटशिक्षणाधिकारी चिमूर यांचे कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.