Home सांस्कृतिक माऊलींच्या पालखी सोहळ्याचं नीरा नदीत परतीचं पवित्र स्नान, वारकऱ्यांना लाभले स्पर्श दर्शन…

माऊलींच्या पालखी सोहळ्याचं नीरा नदीत परतीचं पवित्र स्नान, वारकऱ्यांना लाभले स्पर्श दर्शन…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

पुणे : पंढरपूरहून आळंदीकडे परतीच्या प्रवासाला निघालेला संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा पुणे जिल्ह्यात दाखल झाला. सकाळी ९ वाजता नीरा शहरातील नीरा नदीकाठावर माऊलींच्या पादुकांना पवित्र परतीचं स्नान घालण्यात आलं. “माऊली माऊली” च्या गजरात, पावसाच्या साक्षीने, भाविकांनी हा पवित्र क्षण अनुभवला.

       पावसाच्या सरी, मृदंग-टाळांच्या गजरात आणि हरिनामाच्या गूंजत वारकऱ्यांनी माऊलींच्या पादुकांच्या स्नान विधीला साक्षीदार होण्याचा योग अनुभवला. यावेळी पालखी सोहळामालक राजेंद्र आरफळकर, पालखी सोहळाप्रमुख डॉ.भावार्थ देखणे, प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ तसेच मानकरी व वारकरी उपस्थित होते. यानंतर पालखी सोहळा नीरा येथील विठ्ठल मंदिरात दुपारच्या विश्रांतीसाठी विसावला.

       परतीच्या वारीत नीरा नदीकाठावर झालेल्या पादुकांच्या स्नानानंतर वारकऱ्यांना पादुकांचे “स्पर्श दर्शन” देण्याची परंपरा यंदा पाळण्यात आली. मागील वर्षी हा लाभ न मिळाल्याने काहीसा वाद निर्माण झाला होता. मात्र यंदा कोणताही तंटा न होता, शांततेने आणि भक्तिभावाने प्रत्येक वारकऱ्यापर्यंत पादुका नेण्यात आल्या आणि त्यांना त्या पवित्र दर्शनाचा लाभ मिळाला.

       विठूनामात दंग झालेल्या हजारो भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि श्रद्धेचं तेज स्पष्ट दिसत होतं. पालखीच्या पुढे आणि मागे चालणाऱ्या वारकऱ्यांना जेथे ते उभे होते, तेथे जाऊन पादुकांचे दर्शन मिळावे यासाठी वारकऱ्यांचे स्वयंसेवक आणि पालखी समितीच्या कार्यकर्त्यांनी उत्कृष्ट समन्वय साधला.

        या प्रसंगी स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलं. नीरा गावातील मंडळांनी ठिकठिकाणी फुलांची सजावट, पाणपोई, भजन कार्यक्रमांची व्यवस्था करून आपली सेवा अर्पण केली. वारकऱ्यांनी माऊलींच्या कृपेशी भारावून “ज्ञानोबा माऊली टुकाराम”चा गजर करत पुढील प्रवासासाठी पुन्हा मार्गक्रमण सुरू केलं. पुढील मुक्काम वाल्हे येथे असून उद्या माऊलींचा सोहळा जेजुरी मार्गे सासवडला मुक्कामी असेल.