Home Maharashtra अबब! डूरक्या घोणसच्या पोटातून बाहेर पडली एका मागून एक १४ पिल्ले… ...

अबब! डूरक्या घोणसच्या पोटातून बाहेर पडली एका मागून एक १४ पिल्ले… — ग्रीनफ्रेंड्सच्या सर्पमित्रांनी केले अनेक सापांना व पिल्लांना निसर्गमुक्त… — सर्पमित्राची अभिनंदनीय कामगिरी… — सर्पमित्रांचा केला जातो दरवर्षी सत्कार…

  चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधी भंडारा 

         लाखनी येथील ग्रीनफ्रेंडस नेचर क्लब मागील 20 वर्षापासून वर्षभर सातत्याने व कोणताही ब्रेक न घेता पक्षीसंवर्धन , सर्प बचाव मोहीम ,वृक्षारोपण मोहीम तसेच रात्रीचे आकाश निरिक्षण उपक्रम असे सातत्याने घेत असून सोबतच “लाखनी निसर्ग महोत्सवा”चे मागील 20 वर्षापासून अखंड आयोजन करून विविध पर्यावरण पूरक कार्यक्रम,सर्व सण पर्यावरणपूरक साजरे करणे याअंतर्गत विद्यार्थी नागरिकांसाठी वर्षभर अनेक स्पर्धा कार्यक्रम मागील 20 वर्षापासून लाखनी निसर्गोमहोत्सवाच्या निमित्ताने पर्यावरण जागृती करीत आहे.

        या पर्यावरण जागृती कार्यक्रमामुळे अनेक सर्पमित्र, पक्षीमित्र ,निसर्गमित्र तयार होऊन सर्प बचाव,जखमी पक्ष्यांना,जंगली जखमी प्राण्यांना वाचविण्याचे मोहीम राबवित असतात.नेचर पार्क व ग्रीन पार्क सुद्धा याद्वारे तयार करण्यात आले.

      अशीच एक दुर्मिळ घटना लाखनी येथील समर्थनगर येथे घडली.येथील लिलाधर झलके यांचे घरी बिनविषारी डूरक्या घोणस सापाची सरीसृप संशोधक विवेक बावनकुळे व मनीष बावनकुळे यांनी सुरक्षित सुटका केली. बरणीबंद केल्यानंतर निसर्गात मुक्त करायला जात असताना डूरक्या घोणस सापाने बरणीमध्येच एका मागून एक अशी 14 पिल्ले पोटातून बाहेर पडली.ते सर्व पिल्ले सर्पमित्रांनी बरणीमधून लगेच निसर्गात मुक्त केले.

      या घटनेबद्दल माहिती देताना ग्रीनफ्रेंडसचे कार्यवाह व लाखनी नगरपंचायतचे पर्यावरणदूत प्रा.अशोक गायधने यांनी सांगितले आपल्या भागात बिनविषारी डूरक्या घोणस व विषारी घोणस हे साप पोटातच अंडी उबवून शरीरातून पिल्ले बाहेर प्रसवतात.अशा सापांना विविपेरस किंवा शरीरप्रज्वक म्हणून ओळखले जाते. याशिवाय डूरक्या घोणस सापाला ग्रामीण भागात मुकी मांडवल साप म्हणून ओळखले जाते.याची शेपूट बोथट असल्याने याला दुतोंड्या म्हणतात असा गैरसमज आहे. परंतु ते चुकीची अंधश्रद्धा आहे अशी माहिती त्यांनी दिली.

       याच सर्पमित्रांनी समर्थनगरातील एका घरून दोन धुळनागीन साप सुद्धा निसर्गात मुक्त केले.याचबरोबर सर्पमित्र सलाम बेग याने सुद्धा समर्थनगरातील पार्क जवळ दिगंबर खंडाईत यांचे घरी रात्री 11 वाजता विषारी नाग सापाची सुरक्षित सुटका केली.

          तर गगन पाल व दर्वेश दिघोरे यांनी अशोका बिल्डकॉन मुख्य कार्यालयात 10 फूट लांबीच्या अजगर सापाला रात्री 11 वाजता सुरक्षित पकडून निसर्गात मुक्त केले.वनविभाग वाइल्ड लाईफ रेस्क्यूअर मयूर गायधने व सर्पमित्र सलाम बेग याने बिनविषारी पाणदिवड सापाला नागरिकांच्या घरून मुक्त केले.

         तसेच सर्पमित्र दर्वेश दिघोरे यांने पोहरा व मानेगाव परिसरात वेगवेगळ्या दिवशी तीन महाविषारी आकाराने मोठ्या पट्टेरी मण्यार सापाची नागरिकांच्या घरून सुरक्षित सुटका केली.तसेच पोहरा येथे एका मोठ्या अजगराला सुद्धा सर्पमित्र तुषार कांबळे यांचे सहकार्याने सुरक्षित सुटका करून निसर्गात मुक्त केले.

         सर्पमित्र सलाम बेग याने 30 फूट खोल एका विहिरीत उतरून पाणदिवड सापाची मुक्तता केली.सर्पमित्र आकाश सोनटक्के याने महेंद्र राऊत यांचे घरून विषारी नागाची सुटका केली. सर्पमित्र सलाम बेग याने धामण नर मादी सापाची जोडी लाखनी श्रीनगर येथील महेश तिरपुडे यांचे घरून रेस्क्यू केले.

         अशाप्रकारे ग्रीनफ्रेंडस नेचर क्लबचे सर्पमित्र व निसर्गमित्र यांच्या कामगिरीने अनेक मुक्या जीवांना वाचविले जात असून त्यांच्या या कामगिरीची दखल ग्रीनफ्रेंडस नेचर क्लब तर्फे घेऊन साकोली तसेच लाखनी तालुक्यातील सर्पमित्रांना व निसर्गमित्रांचा सत्कार जानेवारी महिन्यात सन्मानचषक व प्रमाणपत्र देऊन केला जातो. त्यामुळे त्यांना असे कार्य करण्याचे स्फुरण मागील 22 वर्षांपासून मिळत आहे.अनेक पर्यावरणप्रेमी नागरिकांनी ग्रीनफ्रेंड्स सर्पमित्रांच्या या कामगिरीचे अभिनंदन केले आहे.