Home सांस्कृतिक संत ज्ञानेश्वर माऊलींचे ठाकुरबुवा मंदिरासमोर तिसरे गोल रिंगण भक्तिभावात पार…

संत ज्ञानेश्वर माऊलींचे ठाकुरबुवा मंदिरासमोर तिसरे गोल रिंगण भक्तिभावात पार…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

वेळापुर :– संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील तिसरे गोल रिंगण आज (३ जुलै) रोजी सकाळी ९ वाजून ३५ मिनिटांनी ठाकुरबुवा मंदिरासमोर भक्तिपूर्ण वातावरणात पार पडले. या रिंगण सोहळ्यात अश्वांनी तीन फेऱ्या पूर्ण करत उपस्थित वारकऱ्यांचे आणि भाविकांचे डोळे दिपवले.

        संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरच्या दिशेने पायी वारी करत आहेत. ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता हा भक्तिभावाने परिपूर्ण प्रवास सुरू असून, त्यात रिंगण सोहळ्याचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

         आजच्या रिंगणानंतर परिसरात उडीचा, फुगड्या, पावल्या, काटवट, हुतूतू अशा पारंपरिक लोककला आणि खेळ सादर करण्यात आले. महिला आणि पुरुष वारकऱ्यांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. “माऊली… माऊली…” च्या जयघोषाने संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले.

         रिंगणानंतर पालखी रथात विराजमान करण्यात आली आणि सोहळा पुढील टप्प्यासाठी मार्गस्थ झाला. टप्पा येथील माऊली सोपानदेव बंधूंच्या भेटीसाठी पालखी आता भंडीशेगाव येथे मुक्कामी थांबणार असून, पंढरपूरच्या दिशेने हा वारीचा अखंड प्रवास सुरू राहणार आहे.