दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
वेळापुर – सावळ्या विठोबाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचा सोलापूर जिल्ह्यातील दुसरे भव्य गोल रिंगण बुधवारी (दि. २) खडूस परिसरात अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणात पार पडले.
टाळ-मृदंगाचा निनाद, “ज्ञानोबा-तुकाराम” च्या जयघोषांनी आसमंत दुमदुमून गेला होता. भाविकांची अलोट गर्दी, नभांगणात पसरलेली काळी ढगांची दाटी, आणि परब्रह्माच्या भेटीसाठी आतुर झालेल्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत रिंगणाचा सोहळा भक्तिभावाने उजळून निघाला.
पहाटे सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे यांच्या हस्ते माऊलींच्या पादुकांना अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी साडेआठच्या सुमारास पालखी खडूस फाटा येथे दाखल झाली. सेवेकऱ्यांच्या खांद्यावरून पादुका रिंगण तळावर आणण्यात आल्या.
राजाभाऊ चोपदार यांनी रिंगण लावून घेतले, तर शितोळे सरकार यांनी संपूर्ण रिंगणाची पाहणी केली. प्रारंभी भोपळे दिंडी जरीपताका घेऊन रिंगणास प्रदक्षिणा घातली. त्यानंतर रिंगणासाठी सज्ज असलेल्या अश्वांना पादुकांवरील हार घालून बुक्का लावण्यात आले आणि जयघोषात रिंगणास सुरुवात झाली.
स्वाराचा अश्व आणि माऊलींचा अश्व रिंगणात धावू लागले, तेव्हा जणू काही पाठशिवणीचा खेळच सुरू झाला होता. रिंगण संपल्यावर मानाच्या दिंड्या उड्या आणि पावलांच्या खेळासाठी रिंगणात दाखल झाल्या. टाळ-मृदंगाच्या गजरात पाऊलांचा ठेका आणि जुगलबंदी पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. वारीमध्ये तुळशी वृंदावन घेतलेल्या वीणेकरी महिला, पखवाज वादक, टाळकरी, विणेकरी यांनी रिंगणास वेगळेच भक्तिरस प्रदान केला. ‘माउली-माउली’ च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
या सोहळ्यास मुख्य मानकरी शितोळे सरकार, राजाभाऊ आरफळकर, प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, सोहळाप्रमुख डॉ.भावार्थ देखणे, चैतन्य महाराज कबीरबुवा, ॲड.राजेंद्र उमाप, पुरुषोत्तम महाराज पाटील, ॲड.रोहीणी पवार, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, तसेच चोपदार, मानकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.वारकऱ्यांच्या श्रद्धेचा, भक्तीचा आणि शिस्तीचा हा सोहळा खडूसच्या रिंगणात देखील मनाला भावणारा आणि ठसणारा ठरला.



