दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
विडणी – संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने लाखो भाविक टाळ, मृदंग आणि हरिनामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने पायपीट करत आहेत. या भक्तिरसात न्हालेल्या वारीमध्ये रविवारी एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना घडली. फलटणजवळील बरड परिसरात वीजेचा शॉक लागून दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याने वारीत शोककळा पसरली आहे.
मृत वारकऱ्यांची नावे मधुकर तुकारामजी शेंडे (वय ५६, रा. राजाबक्षा, नागपूर) आणि तुषार रामेश्वर बावनकुळे (वय २२, रा. नागपूर) अशी आहेत. हे दोघेही विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही वारीत उत्साहाने सहभागी झाले होते.
पालखी सोहळ्याचा रविवारचा मुक्काम फलटण तालुक्यातील बरड येथे होता. मुक्कामासाठी टोलनाक्याजवळ टेंट उभारणीचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, तुषारने टेंट उभारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी रॉडला हात लावताच त्याला विजेचा तीव्र शॉक बसला. तो रॉडला चिकटून बसला. त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या मधुकर शेंडेलाही विजेचा शॉक बसला आणि दोघेही खाली कोसळले.
घटनेनंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या वारकऱ्यांनी तातडीने 108 क्रमांकावर कॉल करून ॲम्ब्युलन्स बोलावली. दोघांना दुपारी ४.५० च्या सुमारास नातेपुते येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता व्होरा यांनी त्यांना मृत घोषित केल्याची माहिती आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पालखी सोहळ्यात शोककळा पसरली असून, वारकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.



