दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
बेलवाडी : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले अश्व रिंगण सोहळा शनिवारी बेलवाडी येथे भक्तीभावाने आणि दांडग्या उत्साहात पार पडला. रिंगणाच्या माध्यमातून वारकरी भक्तीच्या सागरात चिंब भिजले. टाळ-मृदुंगाच्या गजरात, विठुनामाच्या जयघोषात आणि निःस्वार्थ भक्तीच्या लाटेत रंगलेल्या या सोहळ्याने संपूर्ण परिसर चैतन्यमय केला. सणसर मुक्कामानंतर सकाळीच पालखी बेलवाडीच्या दिशेने प्रस्थान ठेवत भाविकांच्या स्वागत – सत्कारातून गावात दाखल झाली. ग्रामस्थांनी मोठ्या आनंदात आणि भक्तिभावाने पालखीचे स्वागत केले.
अश्व रिंगणाची सुरुवात अक्षय मचाले यांच्या मानाच्या मेंढ्यांच्या रिंगणाने झाली. त्यानंतर टाळकरी, वीणेकरी, तुळशी वृंदावनधारक महिला, झेंडेकरी आदींच्या सहभागातून विविध रिंगणांनी सोहळ्याला अधिक रंगत आणली. विठ्ठल भेटीच्या ओढीने प्रेरित झालेले वारकरी आपले वयोभान विसरून धावत रिंगणात सामील झाले. संपूर्ण रिंगण अलिखित शिस्तीत आणि भक्तिभावाने पार पडले. या दिव्य अनुभवाचे साक्षीदार होण्यासाठी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. डोळ्यांचे पारणे फेडणारा आणि मनाला भक्तिभावाने न्हालून टाकणारा अशा या रिंगण सोहळ्याने वारकरी परंपरेचा वैभवशाली वारसा पुन्हा एकदा जागवला.



