दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्यावतीने आयोजित ‘आरोग्यवारी’ उपक्रम स्तुत्य असल्याचे राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नमूद केले. महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी आयोगाच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या उपक्रमांना राज्य शासनाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
राज्य महिला आयोग आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे आयोजित ‘आरोग्य वारी’ उपक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, सदस्य सचिव नंदिनी आवडे, उपसचिव डॉ. पद्मश्री बैनाडे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जामसिंग गिरासे, आरोग्य उपसंचालक प्रशांत वाडीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, तहसीलदार जीवन बनसोडे, गट विकास अधिकारी सचिन खुडे आदी उपस्थित होते.
भरणे म्हणाले, आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना त्रास होणार नाही, त्यांना चांगल्या प्रकारच्या आरोग्यविषयक सोई-सुविधा मिळाव्यात याकरीता हा उपक्रम राबविण्यात येत आहे. वारकरी महिलांना सॅनिटरी नॅपकिन, बालकांना स्तनपानाकरिता हिरकणी कक्ष, न्हाणीघर, शौचालय, स्वच्छतागृह, दामिनीपथक, प्राथमिक उपचार, रुग्णवाहिका आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
आज संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आज इंदापुर तालुक्यात आगमन होत असून नागरिकांनी वारकऱ्यांची उत्तमपणे सेवा करुन तालुक्याचे नाव राज्यात उज्वल करण्याचे काम करुया, असे आवाहन भरणे यांनी केले.
श्रीमती चाकणकर म्हणाल्या, संत जनाबाई, संत मुक्ताबाईंनी स्त्री मुक्तीची चळवळ वारीच्या माध्यमातून दिली. देहू, आळंदी, मुक्ताईनगर यांसह विविध भागातून वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासत वारीत वारकरी सहभागी होतात. अशा या सहभागी महिलांच्या मासिक पाळीचा आदी आरोग्य आणि स्वच्छताविषयक बाबींचा विचार करुन महिला आयोग आणि पुणे, सातारा तसेच सोलापूर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या ४ वर्षापासून ‘आरोग्य वारी’ प्रशासनाच्या सहकार्याने उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाअंतर्गत तिन्ही जिल्ह्यात १९८ हिरकणी कक्ष, ३० हजार ९८८ शौचालय, ३ हजार ४५४ न्हाणीघर, २२३ वैद्यकीय पथक, ३१७ रुग्णवाहिका, १८९ आरोग्यदूत, २२६ स्थानिक उपचार केंद्र, १२ उपजिल्हा रुग्णालय आणि ४६६ उपकेंद्राचा समावेश आहे. तसेच महिलांना सॅनिटरी नॅपकिन, नॅपकिन बर्निंग इन्सिनरेशन आदी सुविधा प्रत्येक १० ते १२ किलोमीटर अंतरावर केल्या आहेत. महिलांची वारी भक्तिमय असण्यासोबतच आरोग्यमय करण्याचा संकल्प करुया, असे आवाहन श्रीमती चाकणकर यांनी केला.
महिलांना कोणाकडूनही त्रासाला, गुन्हेगारीला सामोरे जावे लागल्यास पोलिसांकडे तक्रार करावी. कौटुंबिक हिंसाचाराच्या अनुषंगाने ‘भरोसा सेल’ काम करते. समस्या न सुटल्यास आयोगाकडे संपर्क साधावा, आयोग आपल्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहील, अशी ग्वाही श्रीमती.चाकणकर यांनी दिली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या ॲड.रेश्मा गार्डे आणि रिटेनर लॉयर संजय चंदनशिवे यांनी महिलांकरिता असलेले कायदे, विधी सेवा प्राधिकरणाच्या सेवांबाबत माहिती दिली. यावेळी श्री. भरणे यांच्या हस्ते आरोग्य उपक्रमाअंतर्गत हिरकणी कक्ष, औषधोपचार केंद्र, कर्करोग जनजागृती वाहनाचे उद्घाटन करण्यात आले, येथील सोई-सुविधांची माहिती जाणून घेतली.



