Home Maharashtra वारकरी भाविकांना कायमस्वरूपी सुविधा देण्याबाबत नियोजन करावे :– पालकमंत्री जयकुमार गोरे…  ...

वारकरी भाविकांना कायमस्वरूपी सुविधा देण्याबाबत नियोजन करावे :– पालकमंत्री जयकुमार गोरे…  — पंढरपूर, माळशिरस तालुक्यातील पालखीतळांची, रिंगण सोहळ्याच्या ठिकाणची केली पाहणी…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

पंढरपूर : आषाढी यात्रेच्या अनुषंगाने यात्रा कालावधीत पालखी सोहळ्या सोबत येणाऱ्या वारकरी भाविकांना पालखी तळांवर, भक्ती सागर (६५ एकर), चंद्रभागा वाळवंट येथे उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या सुविधांची पाहणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून करण्यात आली.

      यावेळी 65 एकर (भक्ती सागर) येथे पाणी साठणार नाही याची दक्षता घेऊन मुरमीकरण व रोलिंग करावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक ती तांत्रिक मदत संबंधित यंत्रणेला करावी.

         तसेच या ठिकाणी वारकरी भाविकांना कायमस्वरूपी सुविधा देण्याबाबत नियोजन करावे. स्वच्छता गृहाची तातडीने दुरुस्ती करून स्वच्छता करावी. चंद्रभागा नदी पत्राच्या कडेला असणारी काटेरी झाडे झुडपे, मातीचे व दगडाचे ढिगारे तात्काळ काढून घ्यावेत. नदीपात्रातील पाणी स्वच्छतेसाठी नगरपरिषदेकडून बसविण्यात आलेल्या सेबर टेक्नॉलॉजी मशीनला तातडीने वीज वितरण कंपनीने विद्युत पुरवठा करण्याचे निर्देश पालकमंत्री गोरे यांनी दिले.

        तसेच पालकमंत्री गोरे यांनी वाखरी, बाजीराव विहीर, श्री संत सोपान काका,भंडीशेगाव, पिराची कुरोली, वेळापूर, माळशिरस, नातेपुते, धर्मपुरी येथील पालखी तळांची व रिंगण सोहळ्याच्या ठिकाणची पाहणी केली.  

        यावेळी बाजीराव विहीर (वाखरी) येथे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराज पालखी सोहळ्याचे गोल रिंगण होते. हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी वारकरी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी उड्डाणपुलाच्या शेजारी असणारे लोखंडी बॅरिकेटिंग रिंगण सोहळा कालावधीत काढून घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

       तसेच पालखीतळांवर पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या वारकरी भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधामध्ये पिण्याचे पाणी, शौचालय, स्नानगृह, महिला भाविकांची व्यवस्था आरोग्य सुविधा, सुरक्षा व्यवस्था आदी बाबतची माहिती तसेच सर्वच पालखी तळांवर मुरमीकरण करावे अशा सूचना दिल्या.

        यावेळी त्यांच्या समवेत आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजीत पाटील, आमदार उत्तमराव जानकर, माजी आमदार राम सातपुते, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, विभागीय आयुक्त कार्यालयाचे अपर आयुक्त तुषार ठोंबरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी, प्रांताधिकारी सचिन इथापे, विजया पांगारकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, सुरेश शेजुळ मुख्याधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, मंदिर समितीची व्यवस्थापक मनोज श्रोत्री तसेच अन्य विभागाचे प्रमुख उपस्थित होते.