ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली, दि. २९ : महाराष्ट्र शासनाचे क्रीडा धोरण २०१२ अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनलाय,महाराष्ट्र राज्य, पुणे द्वारा राज्याचे युवा धोरण २०१२ अन्वये दि. १२ नोव्हेंबर २०१३ रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील युवकांनी व संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कार प्रतीवर्षी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे वतीने देण्यात येतो.
जिल्हा युवा पुरस्कार निवड समिती, गडचिरोली मार्फत सन २०२३-२४ या वर्षाकरीता पुढीलप्रमाणे पुरस्कारार्थीची निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये युवक श्री. राहुल संजय वैरागडे रा. भेंडाळा ता. चामोर्शी, जि. गडचिरोली व युवती कु. सपना सुधाकर लाडे रा. कोरेगाव ता. देसाईगंज, जि. गडचिरोली यांची निवड करण्यात आलेली आहे.
या पुरस्काराचे स्वरुप युवक रोख रु. १०,०००/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) व युवती रोख रु.१०,०००/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे असुन, दि. १ मे २०२८ रोजी महाराष्ट्र दिनाच्या समारंभाचे वेळी पोलीस मुख्यालय, परेड मैदान, गडचिरोली येथे मान्यवरांचे शुभहस्ते, प्रदान करण्यात येणार आहे.
सन २०२३-२४ या वर्षीच्या जिल्हा युवा पुरस्कार (युवक) या पुरस्काराकरीता श्री. राहुल संजय वैरागडे यांनी सामाजिक कार्यात पाणपोई, सामान्य ज्ञान स्पर्धा, गुणवंत विद्यार्थी सत्कार, वनराई बंधारा, पक्षी संवर्धन, वृक्षारोपन, वनसंवर्धन, पथनाटय कोरोणा योध्दा, क्रीडा स्पर्धा, मतदार जनजागृती, रक्तदान शिबीर, पि. एम. किसान योजना, सरकारकडे लोकांच्या समस्या घेऊन जाने, पूरग्रस्त मदत, स्वच्छता कार्यक्रम, अंधश्रध्दा निर्मूलन इत्यादी कार्य केलेले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव होण्याचे दृष्टीने त्यांना जिल्हा युवा पुरस्कार सन 2023-24 प्रदान करण्यात येत आहे.
सन २०२३-२४ यावर्षीच्या जिल्हा युवा पुरस्कार (युवती) या पुरस्काराकरीता कु. सपना सुधाकर लाडे यांनी सामाजिक कार्यात आरोग्य शिबीर, केच द रेन, स्वयंसेवक नोंदणी अभियान, एनिमिया तपासणी केम्प, माझी माती माझा देश, हर घर तिरंगा, जल जीवन मिशन कार्यक्रम, पक्षी संवर्धन, वृक्षारोपन, कोविड-19 लस शिबीर, तालुका क्रीडा स्पर्धा, मतदार जनजागृती, व्यसन मुक्ती, स्वच्छता कार्यक्रम, अंधश्रध्दा निर्मूलन, पोषक आहार इत्यादी कार्य केलेले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव होण्याचे दृष्टीने त्यांना जिल्हा युवा पुरस्कार सन 2023-24 प्रदान करण्यात येत आहे. असे जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी कळविले आहे.


