नैसर्गिकभेद म्हणजे सजीव निर्जीव हा भेद.सजीवात मानव पक्षी पशु वनस्पती आणि जीवजंतू असे जीवाचे पाच प्रकार.प्रकार म्हणजेच भेद. हे पाच नैसर्गिक भेद आपणास त्यांच्या अवयवावरून समजतात,म्हणजे अवयवात सारखेपणा नाही,म्हणजेच एकसारखीच अवयव असलेला जीव म्हणजे तो एक प्रकार.
उदा.पंखाचे ते पक्षी,चार पायाचे ते प्राणी,दोन पाय दोन हाताचे तो माणूस,पंख हातपाय नसलेले ते जंतू आणि सरपटणारे प्राणी असे प्रकार म्हणजे जीवांच्या जाती.या नैसर्गिक आहेत.
परंतु जाती धर्म राष्ट्र हा प्रकार किंवा भेद हा कृत्रिम आहे,म्हणजेच नैसर्गिक नव्हे.हे भेद मानवनिर्मित आहेत,माणसांनीच निर्माण केले आहेत.अर्थात असे प्रकार किंवा भेद निर्माण करण्यामागचा माणसाचा हेतू काय असावा ? याचा पण शोध घेतला पाहिजे,म्हणजेच यामागचे सत्य शोधले पाहिजे.
जात धर्म देश निर्माण करण्यामागचा हेतू तपासल्या नंतर तो हेतू शुद्ध होता की अशुध्द होता ? पवित्र होता की अपवित्र होता ? योग्य की अयोग्य ? हेतू होता ,याचा शोध घेतला पाहिजे.
माणसाचा हेतू तपासणे म्हणजेच त्याचा भाव तपासणे आलेच.अर्थात जाती धर्म देश ही संकल्पना निर्मितीमागेचा मानवाचा भाव शुद्ध होता का ? निस्वार्थ होता का? जनकल्याण होता का ? मनुष्यो उद्धार करणे उन्नती करणे हा त्या मागचा शुद्ध भाव होता का ? की त्यामागे काही कुणाचा स्वार्थ होता ? हे पाहणे म्हणजे भाव तपासणे होय.भेदाभेद हा भाव असेल तर ते मानवाच्या अवनती साठीच झाले हे मान्य करावेच लागते.
“ज्या धर्माचा हेतू माणसाचे स्वातंत्र्य,समानता,न्याय,बंधुता नसेल,किंवा हे हेतू ठेवूनही धर्म स्थापन झाला असेल आणि तसे घडतांना दिसत नसेल तर तो धर्म मी मानणार नाही,कुणीही मानू नये ” या आशयाचे प्रतिपादन प्रज्ञावंत बाबासाहेबांनी केले आहे.” धर्म ही अफूची गोळी आहे,जो कुणी घेईल तो झिंगतच राहील,बुध्दी भ्रष्ट होईल ” असे जागतिक कीर्तीचा आणि जगाचे कल्याणाची चिंता असणारा कार्ल मार्क्स नावाचा एक जागतिक विचारवंत म्हणाला.
जाती निर्मुलनावर तर महात्मा बसवेश्वर फुले ,विठ्ठल रामजी शिंदे ,राजर्षी शाहू महाराज या समाज सुधारकांनी प्रयत्न केला.
आपल्या देशातील संत महात्मे महर्षी महामानव यांनी जाती धर्म राष्ट्र भेद करू नये.जागतिक सारीच माणसे सारखीच आहेत,माणूस हा केंद्रबिंदू मानून त्याची उन्नती हे ध्येय्य ठेवले पाहिजे. यासाठी बंधुभाव न्याय समता स्वातंत्र्य यांचे आधारेच उन्नती शक्य आहे. माणसामाणसात जाती धर्म देशाच्या नावाने भेद करणे,भेदभाव करणे,पाळणे हे माणुसकीचे लक्षण नव्हे,हे धोक्याचे आहे.
अशा या कुबुद्दीच्या धोरणाने काही बोटावर मोजण्या इतक्याच लोकांचा स्वार्थ साध्य होईल,त्यांना सत्ता संपती प्रतिष्ठा मिळेल,पण इतरांचे काय? या पासून सारेच वंचित राहतील.जगातील साऱ्याच माणसांची भौतिक नैतिक उन्नती आणि समृद्धी होण्याची गरज आहे.तसे नाही झाले तर,जात धर्म राष्ट्र वर्ग ही व्यवस्था जोपर्यंत असेल तो पर्यंत जगात देशात सुख शांती संरक्षण समाधान असणारच नाही,जाती जातीत,धर्मधर्मात,देशादेशात ,वर्गावर्गात संघर्ष होतच राहणार.कुणीही शांतीमय जीवन जगणे शक्य नाही.असेच निस्वार्थी,समादृष्टी ,विचारवंतांना वाटत असते.जगाची चिंता ते वाहत असतात.
मोठ्या मनाची,मोठ्या विचारांची माणसे हे दृष्टे असतात.संकुचित विचारांची माणसे स्वार्थी असतात.त्यांची दृष्टी फक्त पाया जवळच असते,तर विशाल मनाच्या विचारांच्या माणसांची दृष्टी ही दूरवर असते,क्षितिजापर्यंत असते. दृष्टी असलेली व्यक्तीच परिवर्तन आणि क्रांती घडवित असतात.



