दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेजने जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग व मुख्याध्यापक संघाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २४ – २५ मध्ये राबविण्यात आलेल्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियानांतर्गत खेड तालुक्यात एक हजारापेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांत निकषांची पूर्तता करत ३०० पैकी २७८ गुण मिळवून खेड तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळविला. यानिमित्ताने गणेश क्रीडा रंगमंच, पुणे येथे पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक नंदकुमार सागर, सचिव प्रसाद गायकवाड आदी संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. हा पुरस्कार श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, विद्यालयाचे पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, शिक्षक गजानन राठोड यांनी स्विकारला.
या वेळी डॉ.भाऊसाहेब कारेकर म्हणाले की ज्ञानेश्वर विद्यालयात चार वर्षांपूर्वी सुरू झालेला “ओळख श्री ज्ञानेश्वरीचा” या उपक्रमाचे कौतुक करीत असताना सांगितले की आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर मूल्य शिक्षणाची नितांत गरज आहे. त्याकरिता आज जिल्ह्यातील जवळजवळ ९० शाळांमध्ये ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ अशा संस्कारक्षम उपक्रमांच्या माध्यमांतून विद्यार्थ्यांमध्ये नीतिमूल्य, संस्कार दिले जात आहेत.
त्यामुळे “ओळख ज्ञानेश्वरीचा” उपक्रम जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये पुढील शैक्षणिक वर्षांमध्ये चालू व्हावा म्हणून प्रयत्न करणार आहे व तसे नियोजन करणार आहे. सर्व शाळांनी त्याकरता सहकार्य करावे असे आव्हान त्यांनी केले.



