Home Maharashtra जेतवन बुद्ध विहार मालेवाडा येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन…

जेतवन बुद्ध विहार मालेवाडा येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन…

शुभम गजभिये

विशेष प्रतिनिधी…

     चिमूर तालुक्यातील जेतवन बुद्ध विहार,मालेवाडा येथे दि.11एप्रिल 2025 रोजी सकाळी ठीक 8.30 वाजता क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

     क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला गुलाबरावजी नरुले,शांतारामजी शेंडे,मोहन सुर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून अभिवादन केले.

       याप्रसंगी प्रदीप मेश्राम यांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले हे प्रखर लेखक,विचारवंत आणि समाजसुधारक होते.त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली.

      महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देऊन मुहुर्तमेढ रोवली.त्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा १८४८ साली पुणे येथे भिडेंच्या वाड्यात उघडली.स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणे,बालविवाहाला विरोध करणे, विधवा विवाहाला पाठिंबा देणे हे त्यांचे मूळ उद्दिष्ट होते.महात्मा ज्योतिबा फुले यांना समाजाला कुप्रथा,अंधश्रद्धेच्या पाशातून मुक्त करायचे होते. 

      त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिलांना शिक्षण देण्यात,महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यात घालवले.19 व्या शतकात महिलांना शिक्षण दिले जात नव्हते. फुले यांना स्त्री-पुरुष भेदभावापासून वाचवायचे होते.

      त्यांनी पुण्यात मुलींसाठी भारतातील पहिली शाळा बांधली.त्यावेळच्या स्त्रियांच्या दयनीय अवस्थेमुळे फुले खूप व्यथित आणि दु:खी झाले होते, म्हणूनच त्यांनी समाजात क्रांतिकारी बदल घडवून आणण्याचा दृढ निश्चय केला.

      त्यांनी स्वतः त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिले.सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या.अशा शब्दात मान्यवरांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन केलं.

        याप्रसंगी शकुंतलाबाई चव्हाण,बहिणाबाई बांबोडे,सत्यफुलाबाई चव्हाण,मिलिंदजी चव्हाण,सुरज गजभिये,आर्यन मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश मेश्राम यांनी केले तर आभार आशिक रामटेके यांनी मानले.