Home सांस्कृतिक समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांचा ‘गुरुवर्य शंकरराव कानिटकर’ पुरस्काराने सन्मान…

समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांचा ‘गुरुवर्य शंकरराव कानिटकर’ पुरस्काराने सन्मान…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

पुणे : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘गुरुवर्य शंकरराव कानिटकर’ पुरस्काराचे वितरण करण्यात आले. आपल्या विशेष किर्तन शैलीतून समाजप्रबोधन आणि जनजागृती करणारे प्रसिद्ध प्रबोधनकार आणि कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांना हा पुरस्कार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले.

         यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र.कुलगुरू प्रा.डॉ.पराग काळकर, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रा.गजानन एकबोटे सर, सहकार्यवाह डॉ.ज्योत्स्ना एकबोटे, निवेदिता एकबोटे, प्रा.शामकांत देशमुख, प्रा.सुरेश तोडकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        निवृत्ती महाराज देशमुख यांच्यासारख्या अतिशय प्रभावीपणे प्रबोधनाचे विचार मांडणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करण्याची संधी मिळणे, हे मी माझे भाग्य समजतो. निवृत्ती महाराजांनी समाजप्रबोधन, लोकशिक्षण आणि वारकरी संप्रदायाचा विचार घरोघरी पोहोचवण्यासाठी अवघा महाराष्ट्र पायाला भिंगरी लावून पिंजून काढला. लोकांना समजेल अशा विनोदी भाषेत आणि उदाहरणांसह त्यांनी पटवून दिलेले वास्तव समाजमनाला नक्कीच भावले आहे असे गौरवोद्गार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व्यक्त केले.

         शिक्षणशास्त्रात पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी आपल्या वडिलांची प्रबोधनाची परंपरा पुढे नेण्याचा प्रभावी प्रयत्न केला आहे. शिवाय समाजप्रबोधन करूनच ते थांबले नाही, तर त्यांनीही स्वतः सामाजिक कार्याचा पट उभा केला. स्वतः गरजूंसाठी माध्यमिक विद्यालय चालवत अनेक अनाथ आणि निराधार मुलांच्या शिक्षणाची निवासी सोय निर्माण केली. आपल्या संतांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे त्यांनी प्रत्यक्ष वाटचाल सुरू ठेवली, हे सर्वांनाच प्रेरणा देणारे आहे असे मोहोळ यांनी सांगितले.