निलय झोडे
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : भंडारा जिल्ह्यात साकोली तालुक्यातील परसोडी ग्रामपंचायत ही २०२५ मधील नाविन्यपूर्ण उपक्रमांना विशेष प्राधान्य देणारी एकमेव ग्रामपंचायत ठरली आहे. येथील सर्व कर्तव्यदक्ष कमेटीच्या पदाधिकाऱ्यांनी हे साध्य करून दाखविले आहे. आणि यात परसोडी ग्रामस्थांचे अतुलनीय सहकार्य लाभले.
साकोली तालुक्याच्या पूर्व दिशेचे शेवटचे गाव म्हणजे परसोडी. येथून गोंदिया जिल्हा सुरूवात होते. परसोडी गावाला आतापर्यंत अनेक आदर्श गाव, निर्मल ग्राम असे विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सन २०२४ – २५ या वर्षात येथे मुलांसाठी बागबगिचे, १००० झाडांची लागवड, गावात प्रत्येक खाजगी नळाला जलमापक यंत्रे, शुद्ध पाण्याचे आर ओ प्लांट, अद्ययावत वाचनालय, सार्वजनिक सुलभ शौचालय, जिल्हा परिषद शाळेचे पूर्ण सुशोभीकरण, गावातील चौकांचे सौंदर्यीकरण, प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुव्यवस्था व स्वच्छता, पेव्हर मशीन द्वारे परीसरातील सौंदर्यकामे, बंदीस्त नाली गटारे यासोबतच अनेक सुखसुविधा आज गावात उपलब्ध आहेत.
यामध्ये ग्रामविकास अधिकारी एस. वाय. नंदेश्वर यांनी सांगितले की, हे सर्व ग्रामस्थांच्या व जागरूक कमेटीच्या पदाधिकाऱ्यांमुळे शक्य झाले. त्यांनी वेळोवेळी कराचा भरणा केला. “आपले गाव, माझी स्वच्छता” हे ध्येय ठेवून गावातील निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सहकार्य केले. तर यावर ग्रामपंचायत सरपंचा जयश्री पर्वते, उपसरपंच प्रशांत कापगते, सदस्यगण संदीप भांडारकर, तुळशीदास पटले, नरेंद्र भांडारकर, फागेश्वर कुसराम, दुर्गा उके, संगीता वडीकार, ओमिता झोडे, वंदना कांबळे, प्रतिमा कांबळे, सुनिता इरले यांनी यशाबद्दल अभिनंदन करीत म्हणाले की, ग्रामपंचायतनी राबविलेल्या सर्व आधुनिक उपक्रमांचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा.
गावात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे हीच गावकऱ्यांना नविन वर्षाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा राहील असे मत व्यक्त केले आहे. या विकासमय प्रगतीसाठी येथील ग्रामपंचायतचे कर्मचारी, रोजगार सेवक व ग्रामस्थांचा सिंहाचा वाटा आहे.



