दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : आळंदी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये काही मतदारांची नावे दुबार आढळून आली आहेत. अशा सर्व मतदारांनी आपले मतदान कोणत्या प्रभागात करावयाचे आहे याबाबतचा लेखी अर्ज नगरपरिषद कार्यालयात सादर करावा, असे आवाहन आळंदी नगरपरिषदेच्या वतीने करण्यात येत आहे.
नगरपरिषद प्रशासनाने दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. माननीय राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या प्राप्त निर्देशानुसार, ज्या मतदारांची नावे आळंदी नगरपरिषदेच्या प्रभाग एक ते दहा मध्ये एकापेक्षा अधिक ठिकाणी नोंदवली गेली आहेत, अशा मतदारांनी परिशिष्ट-१ मध्ये नमूद नमुन्यानुसार लेखी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
सदर परिशिष्टामध्ये संबंधित मतदाराने स्पष्टपणे नमूद करावे की,“मी अमुक एका मतदान केंद्रावर मतदान करू इच्छितो. कृपया मला त्यानुसार मतदान करण्याची परवानगी देण्यात यावी. नेमून दिलेल्या मतदान केंद्राव्यतिरिक्त मी इतरत्र मतदान करणार नाही. उपरोक्त बाबींचा भंग झाल्यास विद्यमान निवडणूक अधिनियमांनुसार मी शिक्षेस पात्र असेन याची मला पूर्ण जाणीव आहे.”
अर्जासोबत मतदाराची स्वाक्षरी आवश्यक आहे. परिशिष्ट-१ हा फॉर्म माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर तसेच आळंदी नगरपरिषद कार्यालयात उपलब्ध आहे. आळंदी नगरपरिषद मतदार यादीत एकूण ५५० मतदारांची नावे दुबार आढळून आली असून, सदर यादी नगरपरिषद कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.



