Home Crime डी-मार्टमध्ये खरेदी दरम्यान चक्क महिला पोलिसाच्या,सोन्याच्या ब्रेसलेटवर चोरांनी मारला हात… —...

डी-मार्टमध्ये खरेदी दरम्यान चक्क महिला पोलिसाच्या,सोन्याच्या ब्रेसलेटवर चोरांनी मारला हात… — गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोर फरार…

अबोदनागो एस.चव्हाण..

 जिल्हा प्रतिनिधी अमरावती 

           दखल न्यूज भारत..‌

अमरावती :- शहरातील गोपालनगर टी-पॉइंट जवळील डी-मार्टमध्ये महिलांनी वेढा घालून तेथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या हातातील सोन्याचे ब्रेसलेट चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

         या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध राजापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

      फिर्यादी महिला (वय ४२, रा.सिव्हील लाईन,दर्यापूर,जि. अमरावती) या अमरावती ग्रामीण पोलीस दलातील महिला पोलीस कॉन्स्टेबल असून त्या दर्यापूर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. 

       दिनांक २४ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ८.१५ वाजता त्या आपल्या कुटुंबासह डी-मार्टमध्ये खरेदी करण्यासाठी आल्या होत्या.त्यावेळी त्यांच्या उजव्या हातात अंदाजे ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे ब्रेसलेट होते.

        दरम्यान,कपड्यांच्या विभागात खरेदी करत असताना काही महिला त्यांच्या भोवती मुद्दाम गर्दी करून उभ्या राहिल्याचा संशय असून,त्याच वेळात त्यांच्या हातातील ब्रेसलेट कोणीतरी अज्ञात इसमाने चोरले.

         नंतर रात्री ९.३० वाजता बिलिंग काउंटरवर पोहोचल्यावर ब्रेसलेट गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्यानंतर त्यांनी तत्काळ ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधून सीसीटीव्ही फुटेज पाहण्याची विनंती केली. 

         मात्र,स्थानिक पोलिसांशिवाय फुटेज दाखवता येणार नसल्याचे त्यांना सांगण्यात आले.या प्रकरणी फिर्यादींच्या तक्रारीवरून कलम ३०५ बीएनएस अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरीचा व चोरांचा तपास सुरु केला आहे.